Nanded Political News : खा. काळेंनी दिले पक्ष संघटन बांधणीचे आदेश!  File Photo
नांदेड

Nanded Political News : खा. काळेंनी दिले पक्ष संघटन बांधणीचे आदेश!

आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी नको; कार्यकर्त्यांचा सूर !

पुढारी वृत्तसेवा

MP Kale gave the order to build a party organization!

नांदेड : नांदेड जिल्ह्याचे काँग्रेस पक्ष निरीक्षक . डॉ. कल्याण काळे शनिवारी नांदेड दौऱ्यावर आले असता दक्षिण व उत्तर ग्रामीण जिल्ह्यातील काँग्रेस पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी गावपातळी ते पंचायत समिती गटांमध्ये नवीन समित्या तात्काळ गठीत करण्याच्या सूचना तालुकाध्यक्षांना दिल्या. वरील बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी, असा एकमुखी सूर काँग्रेस कार्यकर्त्यात दिसून आल्याने जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा विगूल वाजणार असून नांदेड जिल्ह्यातील दक्षिण व उत्तर ग्रामीण काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीसाठी पक्ष निरीक्षक खासदार कल्याण काळे शनिवार रोजी नांदेड शहरात दाखल झाले. काँग्रेस कार्यालयातील बैठकीत बोलताना आगामी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला मजबुतीने सामोरे जावे आणि प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचे आवाहन खा. काळे यांनी केले.

यावेळी खा. काळे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा सविस्तर आढावा घेतला. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवावी की नाही, असे मत जाणून घेतल्यानंतर बहुतांश तालुकाध्यक्ष तसेच पक्ष कार्यकत्यांनी महाविकास आघाडीला विरोध दर्शवत स्वबळाचा नारा दिला. खा. काळे यांनी ग्रामीण पातळीवर पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी पंचायत समिती व गाव पातळीवर वेगवेगळ्या समित्या तयार करून त्यामध्ये सर्व समाजघटकांना समाविष्ट करावे, असे आदेश दिले.

या बैठकीस नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष हनमंत पाटील बेटमोगरेकर, राजेश पावडे, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, माजी आ. माधवराव जवळगावकर, प्रा. यशपाल भिंगे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. खा. कल्याण काळे यांच्या स्वागताच्या कार्यक्रमात राजेश पावडे व हनमंत पाटील बेटमोगरेकर यांच्यात बाचाबाची झाल्याने थोडावेळ वातावरण तंग झाल्याचे दिसून आले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र सामोरे जायचे का नाही, याचा स्थानिक पातळी वरील परिस्थितीनुसार विचार केला जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी केवळ भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. शेवटी भाजपाला पराभूत करणे हा आपला सर्वांचा अजेंडा असणार आहे.
- खा. कल्याण काळे, पक्ष निरीक्षक, नांदेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT