Lokaswaraj Andolan Nanded
नांदेड : अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी लोकस्वराज आंदोलनाच्या वतीने भाऊबीजच्या मुहूर्तावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘भाऊबीज महा सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत काळी दिवाळी साजरी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या वेळी महिला आघाडीच्या संगीता पवळे, सीमा सूर्यवंशी आणि आशाबाई वाघमारे यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या भावांना औक्षण करून सामाजिक न्यायाच्या लढ्यातील शुभेच्छा दिल्या.
लोकस्वराज आंदोलनाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, माजी न्यायमूर्ती अनंत बद्दर समितीची मुदतवाढ रद्द करून तात्काळ उपवर्गीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे सुरू आहे. मात्र, पालकमंत्री, आमदार किंवा खासदार यांच्याकडून या विषयावर एक शब्दही उच्चारला गेलेला नाही. त्यामुळे भाऊबीज निमित्त सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महा सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे म्हटले की, “आमचा समाज आजही आपल्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित आहे. उपवर्गीकरण न झाल्यास भाजपला मतही नाही,” अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला.
गेल्या तीन दशकांपासून लोकस्वराज आंदोलन एससी आरक्षण उपवर्गीकरणासाठी सातत्याने लढा देत आहे. १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्याला एससी आरक्षण उपवर्गीकरणाचा अधिकार दिल्याचा ऐतिहासिक निकाल दिल्यानंतरही सरकारने न्यायमूर्ती अनंत बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समितीचा अभ्यास पूर्ण असून बार्टीचा अहवालही सरकारकडे आहे, तरीही राज्य सरकार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त आश्वासनांचे राजकारण करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
या आंदोलनात प्रा. रामचंद्रजी भरांडे, रावसाहेब दादा पवार, उत्तमदादा गायकवाड, अॅड. दत्तराज गायकवाड, गणपतराव रेड्डी, एकनाथ रेडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर आंघोळ करून काळी दिवाळी साजरी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेकांना ताब्यात घेऊन अदखलपात्र गुन्हे नोंदवले.
महाराष्ट्रभर दिवाळी साजरी होत असताना आम्ही गेल्या तीस दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे करत आहोत. सरकार वेळ मारून नेत आहे. भाऊबीज महा सत्याग्रहाचा उद्देश असा आहे की, वंचित समाजाच्या ‘बहिणीच्या ताटात’ एससी आरक्षण उपवर्गीकरणाची भाऊबीज ओवाळणी टाकावी. सामाजिक न्यायाच्या या लढ्याची हीच खरी दिवाळी आहे.- प्रा. रामचंद्र भरांडे, संस्थापक अध्यक्ष, लोकस्वराज आंदोलन