70.45 percent usable water storage in 21 water projects
किनवट, पुढारी वृत्तसेवा: किनवट तालुक्यातील एकूण २१ जलप्रकल्पांपैकी केवळ चार प्रकल्प पूर्णतः भरले असून सहा क्षमतेपेक्षा थोडे कमी भरले आहेत. मात्र, उर्वरित ११ लघुप्रकल्प अजूनही तहानलेलेच आहेत. सद्यःस्थितीत सर्व प्रकल्पांतील एकूण उपयुक्त जलसाठा ७०.४५ टक्के आहे. सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून दमदार पावसाची गरज आहे.
तालुक्यात नागझरी, लोणी आणि डोंगरगाव येथे तीन मध्यम प्रकल्प, सिरपूर व मांडवी येथे दोन बृहत लघुप्रकल्प, तसेच १३ लघुप्रकल्प आणि तीन साठवण तलाव आहेत. किनवट तालुक्यात मागील चार वर्षांपासून वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात बहुतांश जलप्रकल्प तुडुंब भरून वाहत होते.
यंदा मात्र अनेक लघुप्रकल्पांत तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. त्यामुळे पाणी झिरपून वाया जात असून, जलसंचय होण्यात अडथळा निर्माण झाला आहे.
१ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान १ हजार ०२६.५८ मिमी आहे. आज रविवार (दि.२७) पर्यंत प्रत्यक्षात ५०८.७० मिमी पाऊस झाला असून, तो उपरोक्त पाच महिन्यांच्या सरासरीच्या ४९.५५ टक्के इतका आहे. सध्या तीन मध्यम प्रकल्पांमध्ये ८१.७७ टक्के, दोन बृहत लघु व १३ लघुप्रकल्प मिळून ५७.४४ टक्के, तर तीन साठवण तलावांमध्ये ९२.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
२१ जलप्रकल्पांपैकी लोणी मध्यम प्रकल्प, सिरपूर व अंबाडी हे दोन लघुप्रकल्प आणि निराळा साठवण तलाव हे चारच प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. नागझरी मध्यम प्रकल्प, पिंपळगाव (कि.) लघुप्रकल्प आणि सिंदगी साठवण तलाव हे ९५ टक्क्यांच्या आसपास भरले असून, थारा, जलधारा व लक्कडकोट साठवण तलाव हे ७५ ते ८५ टक्क्यांदरम्यान भरले आहेत. उर्वरित ११ प्रकल्पांपैकी कुपटी, सिंदगी व पिंपळगाव (भि.) प्रकल्पांत तांत्रिक दोषांमुळे पाणीसाठा टिकून राहत नाही. नंदगाव प्रकल्प तर दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरतच नाही. यंदाही अर्धा पावसाळा उलटून गेल्यावरसुद्धा पाणी ज्योत्याच्या वर गेलेले नसल्यामुळे, त्याची नोंदच घेतली गेलेली नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.