हिमायतनगर: पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली असताना, हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. गावाच्या अल्पभूधारक शेतकरी भक्त सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय पूजेचा बहुमान मिळाला.
गेल्या वीस वर्षांपासून विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी न चुकता वारी करणाऱ्या या वारकरी दाम्पत्याच्या निष्ठा आणि भक्तीचे आज खऱ्या अर्थाने फळ मिळाले आहे. हिमायतनगर तालुक्यात आजपर्यंतच्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या दाम्पत्याला शासकीय पूजेचा हा मानाचा बहुमान मिळाला आहे, ज्यामुळे त्यांचे कुटुंब आनंदित झाले आहे. 'अनेक दिवसांच्या पंढरपूर वारीचे फलित विठ्ठलाने दिले,' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
रविवारी 2 नोव्हेंबर रोजी (कार्तिकी एकादशी) सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पूजा पार पडली. यावेळी, दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या पोटा बु. येथील रहिवासी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना 'माळकरी मानाचा वारकरी' म्हणून उपमुख्यमंत्री यांच्यासोबत पूजेचा मान मिळाला.
यावेळी वालेगावकर कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "आज कार्तिकी एकादशीला आमचं भाग्य उजळलं असून विठ्ठलाच्या मानाचा वारकरी म्हणून शासकीय पूजेचा मान मिळाला. उपमुख्यमंत्र्यांसोबत सपत्नीक पूजेचा मान मिळणे म्हणजे वीस वर्षांपासूनची वारी फळाला आली असून हे केवळ विठ्ठलाच्या कृपेने शक्य झाले."
या विशेष सन्मानासोबतच, या वारकरी दाम्पत्याला महाराष्ट्रभर बस प्रवासाची एका वर्षाची पास मोफत मिळणार आहे. ह.भ.प. माधव महाराज बोरगडीकर यांनी या शेतकरी कुटुंबाला मिळालेल्या मानाचे कौतुक केले असून, तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पोटा गावाकडून तालुक्यात सर्वत्र या भाग्यवान दाम्पत्याचे अभिनंदन होत आहे.