चाकूर, पुढारी वृत्तसेवा : येथील एका नगरसेविकेच्या पतीचे दिवसाढवळ्या ५५ हजार चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी (दि.6) दुपारी घडली. यानंतर अज्ञाताविरुद्ध चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाकूर येथील रहिवासी महमद हुसेन महेताबसाब सय्यद (वय.४५) हे शुक्रवारी (दि.6) दुपारी त्यांच्या मित्रांसोबत दुचाकीवरुन महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी बँकेसमोर स्कुटी लावून बँकेत गेले असता त्यांनी बँकेतून ५५ हजार रूपये काढले. पैसे स्कुटीमध्ये ठेवून नगर पंचायत कार्यालयात स्कुटी पार्किंगमध्ये लावून मित्रा सोबत नगरपंचायतमध्ये कामानिमित्त गेले. त्यानंतर दुपारी १२ वाजून २० मी वाजताच्या सुमारास नगर पंचायत कार्यालयातून त्यांनी हातातील कागद डिक्कीमध्ये ठेवण्यासाठी येऊन डिक्की उघडताच स्कुटीचे लॉक तुटलेले दिसले.
यानंतर गाडीमध्ये डिक्कीमध्ये ठेवलेले ५५ हजार रूपये गायब झाल्याचे कळताच त्यांनी स्कुटीच्या डिक्की काढताना कोणी बघितल्याचे नगरपंचायत समोर असलेल्या काही लोकांना विचारपूस केली. तेंव्हा त्यांना कोणीही पाहिले नसल्याचे सांगीतले. त्यावेळी त्यांनी आजुबाजूला पैशाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता काहीच पत्ता लागला नाही. अज्ञात चोरट्याने स्कूटीची डिक्की तोडून स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले ५५ हजार रुपये चोरून लांबविल्याचे लक्षात आले. महमद हुसेन महेताबसाब सय्यद यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरूध्द चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल योगेश मरपल्ले हे करीत आहेत.