Latur Naam Foundation, Can Pack India distribute 2,000 kits to those affected by heavy rains
लातूर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना आधार देण्यासाठी नाम फाउंडेशन व कॅन पॅक इंडिया रसावली असून लातूर व धाराशिव जिल्ह्यातील या आपत्ती बाधित शेतकरी परिवाराला दोन हजार किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे. एक हात माणुसकीचा या भावनेतून साकारलेल्या या बांधिलकीप्रति सर्वत्र कृतज्ञता व्यक्त होत आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे, शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची गुरे, शेती, अवजारे वाहून गेली आहेत. घरे पडली आहेत. घरात पाणी शिरल्याने अन्नधान्यांसह संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. अशा परिवारांना किट देण्यात आले आहेत. लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांत ही मदत कार्यकर्त्यांनी अगदी घटनास्थळी जाऊन पोहचवली आहे.
या कार्यक्रमात जिल्हा समन्वयक विलास चामे, डॉ. हर्षवर्धन राऊत विश्वनाथ खंदाडे, ज्ञानेश्वर चेवले, रामलिंग शेरे, जयंत पाटील, विठ्ठल बोयणे, प्रमोद घायाळ आणि संस्थेचे अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या, धीर दिला आणि परिस्थितीबाबत माहिती घेतली.
संकटाची व्याप्ती मोठी असून शेतकरी व अतिवृष्टी बांधितांना आधार देण्यासाठी दशदिशांनी मदत येणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी केले आहे. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हिंमत सोडू नये असे सांगत आम्ही आपल्या सोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला आहे.