Latur Cyber awareness from Bharud
लातूर, पुढारी वृत्तसेवा राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त), लातूर आणि क्लिक हिल फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यात "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारुडातून सायबर सुरक्षा जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागातील बी.एस्सी. सी.ए. व बी.एस्सी. सी.एस. चे विद्यार्थी सायबर वॉरियर्स, लातूर शहरासह आसपासच्या गावांतील शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा घेऊन सायबर सुरक्षा विषयावर जनजागृती करत आहेत. तसेच विविध शासकीय कार्यालये, बँका, दवाखाने, महिला बचत गट आणि आशा कार्यकर्त्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करून नागरिकांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापराबाबत माहिती दिली जात आहे.
महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला भारूडाचा उपयोग करून, विद्याथ्यर्थ्यांनी सायबर गुन् हेगारीविषयी जनजागृती करण्यासाठी "सायबर भारूड" तयार केले. महाविद्यालयातील "गातोय भारूड सायबरचे" कार्यक्रमात या भारुडाचे सादरीकरण करण्यात आले. भारुडामध्ये मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे उद्भवणारे दुष्परिणाम, अनोळखी लिंक्स व वेबसाईटपासून घेतली जाणारी काळजी, फोटो मॉर्किंग, अकाउंट हॅकिंग, आर्थिक फसवणूक अशा सायबर फ्रॉड्सची माहिती सादर करण्यात आली. याशिवाय सायबर हेल्पलाईन १९३०बाबत विद्याथ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली गेली. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांच्या हस्ते झाले.
उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ पांचाळ, उपक्रमाचे समन्वयक प्रा. ज्योती माशाळकर, विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग या कार्यक्रमात उपस्थित होते. महाविद्यालयातून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर भविष्यात या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांमध्ये सायबर सुरक्षिततेची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.