मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.  Pudhari News Network
लातूर

अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बांधावर

पुढारी वृत्तसेवा

लातूर, पुढारी वृतसेवा : जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (दि.४) थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारातील पीक नुकसानीची पाहणी केली.

नुकसानीचे पंचनामे वेगाने करण्याच्या सुचना 

एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात नुकसान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, क्रीडा मंत्री संजय बनसोडे , माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यावेळी उपस्थित होते.

एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देणार 

मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लातूर जिल्ह्यातही अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आज प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले. सोयाबीन पिकामध्ये अजूनही पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांना मदत करताना नियम, निकष न पाहता एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल. असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. पंचनाम्याचे अहवाल येताच नुकसानभरपाईबाबत पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT