टेंभुर्णी : जाफ्राबाद तालुक्यातील वाढोणा तांडा येथे दुर्दैवी घटना घडली असून, पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. मृत मुलांची नावे ओम गणेश आढे (वय ११) आणि कुणाल आढे (वय १३) अशी आहेत.
दोघेही काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश आढे यांच्या भावाचे मुलगे असून, सध्या देऊळगाव राजा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होते. ओम पाचवीत तर कुणाल सातवीत शिकत होता. शाळेच्या परीक्षा संपल्याने दोघे काही दिवसांसाठी वाढोणा तांड्यावर घरी आले होते.
सुट्टीचा फायदा घेत त्यांनी गावाशेजारील तलावात पोहण्यासाठी जाण्याचे ठरवले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे खोल पाण्यात गेले आणि बुडाले. तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या इतर मुलांनी आरडाओरडा केली, परंतु बहुतांश लोक शेतीच्या कामात व्यस्त असल्याने वेळेत मदत मिळू शकली नाही.
दोघांनाही तत्काळ टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल वाघ यांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ही बातमी कळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. शिवसेना नेते जनार्दन झोरे, सरपंच विजय परिहार, उध्दव दुनगहू आदींनी रुग्णालयात धाव घेऊन कुटुंबीयांना सांत्वन केले.