विलास जाधव
जामखेड : जिल्हा परिषदेसाठी ओबीसी सर्वसाधारण आणि पंचायत समितीसाठी ओबीसी महिला प्रवर्ग आरक्षित ठरल्याने जामखेड सर्कलमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षात गटबाजी, बैठका, संपर्क, मोहिमा आणि रणनीती आखणीचे राजकारण रंगात आले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा माहोल असून, गावोगाव संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय समीकरणांचा फेरबदल होत असताना महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार या तिन्ही पातळ्यांवरून सर्कलमध्ये चुरशीची लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मागील कार्यकाळात विकासकामांना मिळालेली मर्यादित गती, प्रशासनाची उदासीनता आणि काही लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे यावेळी मतदार “काम करणाऱ्या” उमेदवारांकडे झुकतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.
सध्या चर्चेत असलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये महायुतीकडून डॉ. जी. एस. पांढरे, पल्लवी तारडे, रामचंद्र कठाळराव भोजने आणि सचिन जाधव ही नावे जिल्हा परिषदेसाठी चर्चेत आहेत. पंचायत समिती जामखेड गणातून भगवान भोजने, हरिश्चंद्र भोजने, सुरज पांढरे, कान्होजी कुंडकर आणि आबासाहेब भोजने ही नावे समोर आली आहेत.
महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेसाठी सिताराम धुळे, रतन तारडे आणि भाऊसाहेब भोजने हे इच्छुक आहेत. तर पंचायत समितीसाठी ज्ञानेश्वर जाधव आणि परमेश्वर धुळे या उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. चिंचखेड गणातून रमेश पैठणे, संपत राठोड आणि बंडू सोळुंके हेही इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून जिल्हा परिषदेसाठी बाबासाहेब वैराळ यांचे नाव चर्चेत आहे, तर अपक्ष पातळीवर पुंजाराम ऊरै पंकज सुखदेव मंडलिक हे जामखेड गटातून जनसेवेच्या माध्यमातून प्रभावी उमेदवार म्हणून उदयास आले आहेत.
दरम्यान, या सर्व इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटी सुरू केल्या असून, छोट्या-मोठ्या गावांत संपर्क मोहिमा वाढवल्या आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होत जनतेशी संवाद साधण्यास ते पुढाकार घेत आहेत. काही ठिकाणी प्रचाराची प्राथमिक आखणी, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि जनमत चाचण्या सुरू झाल्या आहेत.
जामखेड सर्कलमध्ये अनेक इच्छुक उमेदवार असल्याने पक्षांतर्गत तिकीट वाटपाची प्रक्रिया अवघड होणार आहे. प्रत्येक गटात एकापेक्षा अधिक दावेदार असल्यामुळे काही ठिकाणी नाराजीची चिन्हे दिसू लागली आहेत. जर काही उमेदवारांना पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास त्यांची बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही. काहीजणांनी अपक्ष म्हणून लढण्याचा पर्यायही खुला ठेवला आहे. यामुळे सर्कलमधील राजकीय चित्रात मोठा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा बंडखोरीमुळे मतविभाजनाचे समीकरण बदलू शकते आणि कोणत्या पक्षाची बाजू मजबूत राहील, हे सांगणे आतापासून कठीण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने “बंडखोर रोखा मोहीम” हाती घेण्याची तयारी सुरू केली असून, स्थानिक स्तरावर समन्वय साधण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
जामखेड सर्कलमधील नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष रंगत येणार हे निश्चित आहे. जुन्या व नव्या नेतृत्वातील संघर्ष, बंडखोर उमेदवारांची समीकरणे आणि मतदारांचा मूड या सगळ्यामुळे जामखेड सर्कल आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतील “सर्वाधिक चर्चेचे रणांगण” ठरणार आहे.