Jalna Soil and Water Conservation Sub-Division
भारत सवणे
परतूर : मृदा व जलसंधारण उपविभाग, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, परतूर यांच्या कार्यालयात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक भेट दिली असता, कार्यालयात एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित आढळून आला नाही. संपूर्ण कार्यालय रामभरोसे असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये महत्त्वाचे असलेले कार्यालयातील लिपिकही त्यांच्या जागेवर आढळून आले नाहीत. सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह लिपिकही गायब असल्याने गैरहजर आढळून आले. कार्यालयातील सर्व टेबल खुर्चा रिकाम्या होत्या आणि महत्त्वाचे म्हणजे कार्यालयात कोणी नसतानाही पंखे सुरू होते, ज्यामुळे वीज बचतीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. कामकाजाच्या वेळेत अधिकारी व कर्मचारी यांची गैरहजेरी स्पष्टपणे दिसून आलीच, पण त्यासोबतच कार्यालयात नीट स्वच्छता नसल्यामुळे सर्वत्र धूळ दिसून येत होती. कार्यालयाबद्दलची आस्था किती आहे, हे स्पष्ट होते.
जलसंधारण अधिकारी आर. एफ. शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला या गंभीर स्थितीबाबत जलसंधारण अधिकारी एस. व्ही. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, ते बाहेर कामावर गेले असल्याची माहिती मिळाली, तर, उपविभागीय असता, तो होऊ शकला नाही.
सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व शासकीय कामकाजाची शिस्त कायम राखण्यासाठी तसेच कार्यालयाच्या सुरक्षेच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने, वरिष्ठांनी या गंभीर बाबीची तातडीने दखल घ्यावी. गैरहजर राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर, तसेच कामात कसूर करणाऱ्या योग्य ती कार्यवाही करावी आणि कार्यालयात वेळेवर उपस्थित राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सर्वत्र वीज बचतीसाठी जनजागृती सुरू असताना, या शासकीय कार्यालयात कोणी नसतानाही पंखे सुरू ठेवण्यात आले होते. यावरून कर्मचाऱ्यांमध्ये शासकीय नियमांविषयी किती गांभीर्य आहे, हे दिसून येते. अधिकारी यांचे दुर्लक्ष आहे.