शहागड : अबंड तालुक्यातील पाथरवाला बु येथे शेतकरी संतोष शिर्के हे 14 एप्रिल रोजी राहत्या घरातून पाथरवाला बु येथून कोणालाही काही न सांगता आठ वाजेच्या सुमारास घरातून निघून गेले होते. घरच्या मुला-मुलींनी त्यांच्या मोबाईलवर फोन केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही, सकाळी शोध घेत असताना त्यांच्या पत्नीला पाथरवाला बु. शिवारातील पाथरवाला खुर्द रोड जवळच्या स्वत:च्या शेतात जाऊन बघितले असताना 15 एप्रिल रोजी सव्वासात वाजेच्या सुमारास शेतकरी संतोष शेषराव शिर्के (वय 45) यांनी स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन जीवन संपवल्याचे निदर्शनास आले.
यानंतर त्यांनी आरडा-ओरडा केल्यानंतर शेजारील शेतकऱ्यांनी धाव घेत गोंदी पोलिसांना माहिती देऊन, झाडाला लटकलेला मृतदेह खाली घेतला. शेताच्या बांधावरच्या रस्त्याच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती येत होती. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बलभीम राऊत यांनी पंचनामा केलेला असून, शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 15 एप्रिल रोजी दुपारी वैद्यकीय अधिकारी नरवडे यांनी शव विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलेला असून, पाथरवाला बु. येथील गोदावरी नदीकाठी चार वाजता संतोष शिर्के यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक मुलगी ,एक मुलगा पत्नी असा परिवार असून, शेजारी असलेल्या शेतकरी यांच्या रस्त्याच्या अडवणुकीमुळे त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती असून याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बलभीम राऊत हे करीत आहेत.