Ambad Farmer Crisis
शहागड: आसमानी संकट, अतिवृष्टी, गोदावरीला महापूर, कर्जबाजारी शेतकऱ्यांनी, कर्जमाफी होत नसल्यामुळे आणि अतिवृष्टी व महापुराचे अनुदान तत्काळ खात्यामध्ये जमा न झाल्याने पाथरवाला बु. येथील शेतकरी हरिभाऊ आसाराम अवधुत यांने दोन दिवसापूर्वी पाथरवाला शिवारात कपाशीच्या शेतात लिबांच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.४) सकाळी उघडकीस आली.
पावसाने उघडीप दिल्याने कडक ऊन असल्याने बाजूच्या शेतातील कापूस वेचणाऱ्या महिलांच्या मुलांना ही घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही माहिती गोंदी पोलिसांना दिली. उपनिरीक्षक संतोष मुपडे, शाकेर सिद्दिकी, विजय काळे, यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.