Upper Superintendent of Police Archana Patil transferred to Bhokar
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा हिंगोली जिल्हा पोलिस दलात कार्यरत असतांना अडीच वर्षातच अनेक गुन्हेगारांना वठणीवर आणत लेडी सिंघम म्हणून ओळख निर्माण झालेल्या अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांची भोकर येथे बदली झाली असून त्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले आहेत.
हिंगोली पोलिस दलात अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून डिसेंबर २०२२ मध्ये रुजू झालेल्या अर्चना पाटील यांनी वेगवेगळ्या कामगिरीतून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाचे अतिक्रमण हटवताना जमावाने गोंधळ केल्यानंतर थेट जमावामध्ये जाऊन त्यांनी कारवाई सुरु केली होती. त्यामुळे जमाव नियंत्रणात आला अन पुढील अनर्थ टळला होता.
या शिवाय वसमत, औंढा नागनाथ, हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत काही गावांतून उद्भव लेल्या दंगल सदृष्य परिस्थितीत त्यांनी पोलिस बंदोबस्तासह घटनास्थळी जाऊन जमावाला नियंत्रण केले होते. या प्रकरणात गुन्हे दाखल करून गोंधळ घालणाऱ्यांना अटकही करण्यात आली होती. या शिवाय गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी सततचे गुन्हे करणाऱ्यांना जिल्ह्यातून हद्दपार तसेच स्थानबद्धतेच्या कारवाईमधूनही त्यांनी महत्वाची भुमीका बजावली आहे. याशिवाय सध्या नांदेड परिक्षेत्रात सुरु असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी मोहिमेत त्यांनी स्वतः भल्या पहाटेच ग्रामीण भागात जाऊन दारु अड्ड्यावर छापे टाकून दारु अड्डे उध्वस्त केले. तसेच दारु गाळप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले.
जिल्ह्यात विविध आंदोलनाच्या वेळी तसेच मोठ्या सभांच्या वेळी बंदोबस्ताची धुरा त्यांच्या खांद्यावर होती. या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या शिस्तप्रिय अन कडक भूमिकेमुळे त्यांची पोलिस दलातील लेडी सिंघम अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली होती. त्यांची आता भोकर येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागेवर भोकर येथील खंडेराव धरणे हिंगोली येथे नियुक्त करण्यात आले आहेत.