हिंगोली जिल्ह्यातील शिक्षक सामूहिक रजेवर; ३७१६ पैकी २६५४ शिक्षकांची रजा  pudhari photo
हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील शिक्षक सामूहिक रजेवर; ३७१६ पैकी २६५४ शिक्षकांची रजा

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्रांवर हिंगोली जिल्ह्यात ३७१६ पैकी २६५४ शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामुळे जिल्ह्यातील ८७९ शाळांच्या अध्यापनावर परिणाम झाला आहे.

राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी, शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, समान काम समान वेतन या धर्तीवर सर्वच शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी लागू करावी, आधारकार्ड अधारित शिक्षक पदनिर्धारण धोरण रद्द करावे, विद्यार्थ्यांना तातडीने गणवेश देण्यात यावेत यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.

या मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, शासनाकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शिक्षक संघटनांनी बुधवारी मोर्चाचे आयोजन केले होते. या आंदोलनात रजा घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनांनी केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ८७९ शाळातील ३७१६ शिक्षकांपैकी २६५४ शिक्षक सामुहिक रजा घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. तर १०६२ शिक्षक कार्यरत होते.

या शिक्षकांसोबतच मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमातून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी शाळेचे कामकाज पाहिल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. तर या आंदोलनामुळे शाळा सुरू होत्या मात्र अध्यापनाचे काम झाले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हाभरातील शिक्षक हिंगोली येथे एकत्र आल्यानंतर सकाळी आकरा वाजता बहुविध प्रशालेच्या मैदानावर मोर्चा काढण्यात आला.

शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. विशेष म्हणजे शहरात पाऊस सुरू असतानाही मोर्चा सुरूच होता. शासनाने शिक्षकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा शिक्षक संघटनांच्या वतीने देण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT