Hingoli News : शेतकऱ्यांच्या शेकडो क्विंटल धान्याची नासाडी File Photo
हिंगोली

Hingoli News : शेतकऱ्यांच्या शेकडो क्विंटल धान्याची नासाडी

वखार महामंडळाच्या गोदामातील प्रकार, पथकाने केली पाहणी

पुढारी वृत्तसेवा

Hundreds of quintals of farmers' grain wasted in warehouse of warehouse corporation

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरालगत लिंबाळा औद्योगिक वसाहतीच्या परिसरात असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामात शेतकऱ्यांनी साठविलेल्या शेकडो क्विंटल धान्याची नासाडी झाली आहे. यामुळे चांगला भाव मिळेल या अपे-क्षेने येथे शेतीमाल साठवलेल्या शेतकऱ्यांवर एक वेगळेच संकट ओढवले आहे. या प्रकरणात गुरुवारी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने गोदामात पाहणी केली.

हिंगोली येथे वखार महामंडळाचे गोदाम असून या ठिकाणी ७१ हजार क्विंटल धान्य साठवणुकीची क्षमता आहे. शासनाच्या हमी भावाने खरेदी केलेला शेतीमाल तसेच शेतकऱ्यांचा शेतीमालाची या ठिकाणी साठवणूक केली जाते.

बाजारपेठेत शेतीमालास योग्य भाव नसेल तर शेतकरी शेतीमाल गोदामात साठवून ठेवतात त्यानंतर बाजारात भाव वाढल्यानंतर शेतीमाल बाजारपेठेत आणतात. त्यासाठी हळदीला १३ रुपये कट्टा तर सोयाबीनला ८.८० पैसे क्विंटल दरमहा शुल्क आकारले जाते. या शुल्कामध्ये शेतकऱ्यांना काही प्रमाणात सुट दिली जाते. दरम्यान, येथील गोदामात मोठ्या संख्येने धान्य साठविण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने हळद, सोयाबीन, करडई, हरभरा या पिकांचा समावेश आहे.

महामंडळाकडून या ठिकाणी दर महिन्याला धुरफवारणी करणे अपेक्षीत आहे. मात्र महामंडळाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालास किड लागली आहे. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी तातडीने पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार गुरूवारी अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या पथकाने गोदामाला भेट देऊन पाहणी केली. यामध्ये अनेक ठिकाणी हळद, सोयाबीन, हरभरा पिकांच्या पोत्यांना किड लागल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी पाण्याने शेतीमाल भिजल्यामुळे बुरशी लागल्याचे दिसून आले. यामध्ये शेकडो क्विंटल धान्य खराब झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

महामंडळाकडून धान्याची योग्य काळजी घेण्यात आली नसल्यानेच असा प्रकार झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणात आता पथकाकडून सादर केल्या जाणाऱ्या अहवालावरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT