Hingoli Shiv Sena Thackeray group Local Body Election
उमर फारूक शेख
कळमनुरी : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष मोर्चेबांधणी करीत असताना तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटात भयाण शांतता असून दररोज नेते व कार्यकर्ते जिल्ह्याच्या कमकुवत नेतृत्वामुळे पक्षाला राम राम ठोकत पक्ष बदल करीत आहेत. निवडणुकीसाठी ठाकरे गटात कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने निवडणुकीपूर्वीच शिवसेना ठाकरे गट रणांगणातून बाद झाला की काय अशी चर्चा होत आहे.
येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीचे वारे वाहत असताना गट, गण व शिवसेना शिंदे गट आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कामाला लागला आहे. प्रभागासाठी उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी यादीच त्यांच्याकडे तयार झाली तर भाजप कडून शिस्तबद्धरित्या तयारी सुरु असताना मात्र काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटात मात्र सामसूम आहे.
जिल्हा पातळीवरील नेते कमकुवत असल्यामुळे नेतृत्वहीन दिशा मिळालेल्या अवस्थेत असल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. निवडणूक लढू इच्छुक असणाऱ्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर निवडून कसे येणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. मातब्बर नेते पक्ष सोडत आहेत. पण दोन्ही जिल्हाध्यक्षांमध्ये ही गळती थांबवण्याची ताकदच नसल्यामुळे या महिन्याभरसत अनेक निष्ठावंत नेते, कार्यकर्ते इतर पक्षात घरोबा करीत आहेत.
त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवार पण मिळणार की नाही अशी अवस्था निर्माण होणार आहे. त्यामुळे निवडणुकी पूर्वीच शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस रणांगणातून बाद होईल अशी चर्चा नागरिकांत होत आहे.
तालुक्यात शिवसेना ठाकरे गट ताकदवान असताना जिल्हा पातळीवर कमकुवत नेतृत्वाचा सर्वात मोठा लाभ शिंदे सेनेला होत असताना दिसून येत आहे. आ. संतोष बांगर यांचे आक्रमक व लोकप्रिय नेतृत्व व कार्यकर्त्यांना बळ देणारी छवीमुळे ठाकरे सेनेचे नेते शिंदे सेनेत दाखल होत आहेत. त्यामुळे येत्या नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भगवा फडकण्याचे चिन्ह दिसत आहे.