हिंगोली : घरकुलाच्या संयुक्त पाहणी अहवालावर स्वाक्षरी करून दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी घोडा (ता. कळमनुरी) येथील सरपंचाच्या सांगण्यावरून पाच हजाराची लाच घेणाऱ्या एकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.९)रंगेहात पकडले. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
कळमनुरी तालुक्यातील घोडा येथील तक्रारदारास त्याच्या वडिलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाचा पहिला हप्ता देखील मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी संयुक्त पाहणी अहवालावर स्वाक्षरी करून ७० हजाराचा दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी सरपंच रावसाहेब पाईकराव याने गावातील सोनबा पतंगे यांच्या मार्फत पाच हजार रुपयांची लाच मागितली.
या प्रकरणात तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून लाचलुचपत विभागाने पडताळणी केली. यामध्ये सरपंच रावसाहेब याने सोनबा याच्या कडे पाच हजार रुपये देण्याचे सांगितले. त्यावरून पोलिस अधिक्षक संदीप पालवे, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दुपारी लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युनुस शेख, विजय शुक्ला, जमादार राजाराम फुफाटे, भगवान मंडलिक, विनोद पुंडगे, शिवाजी वाघ, शेख अकबर यांच्या पथकाने कळमनुरी येथे सापळा रचला होता.
दरम्यान, ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने पाच हजार रुपये घेऊन कळमनुरी गाठले. यावेळी सोनबा पतंगे याने लाचेची रक्कम घेताच त्यास लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या तक्रारीवरून सरपंच रावसाहेब पाईकराव, सोनबा पतंगे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणात सरपंच रावसाहेब याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.