Dr. Ramesh Shinde's entry into Congress will change the equations
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात काँग्रेसची एकीकडे वाताहात होत असताना दुसरीकडे शेतकरी नेते म्हणून ओळख असलेले डॉ. रमेश शिंदे यांनी शुक्रवारी मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी हिंगोली विधानसभेत काँग्रेसला काहीसे बळ मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
जिल्ह्यात अंतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे काँग्रेसची वाताहात झाली. माजी नगरसेवकांसह काही ज्येष्ठ नेते पक्ष सोडून गेल्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाला उमेदवार तरी मिळणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत काही निष्ठावंतांच्या विश्वासावरच पक्षाची कमान टिकून राहिली आहे.
दरम्यान, पक्षातून आऊटगोईंग होत असतांना हिंगोली विधानसभा मतदार संघात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वेळो-वेळी आवाज उठवणारे तसेच वेळो-वेळी आंदोलन करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. रमेश शिंदे यांनाच पक्षात प्रवेश देण्याची तयारी वरिष्ठ पातळीवरून सुरु होती. त्यानुसार चर्चेच्या काही फेऱ्या देखील झाल्या होत्या.
त्यानंतर शुक्रवारी मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत डॉ. शिंदे यांचा काँग्रेस मधे प्रवेश झाला. यावेळी पक्षाचे विधानसभा निरीक्षक साहेबराव कांबळे, सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष सुरेश सराफ, माजी नगरसेवक अनिल नेनवाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढवणाऱ्या डॉ. शिंदे यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला हिंगोली विधानसभा मतदार संघात चांगले दिवस पहावयास मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाला काही प्रमाणात का होईना बळ मिळणार असल्याचे राजकिय वर्तुळातून बोलले जात आहे.