BJP MLAs have expressed displeasure over the Guardian Minister's approach.
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर ठाकरे गटाच्या खासदारानंतर आता भाजपच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. हिंगोलीत आवश्यकता नसलेल्या ठिकाणी कामे मंजूर केल्याचा आरोप करून या कामाला स्थगिती देण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भातील पत्र भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पाठविले आहे.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे नियुक्ती पासूनच चर्चेत आले आहेत. हिंगोलीत केवळ ध्वजवंदनासाठी येणारे पालकमंत्री हिंगोलीत मुक्कामी थांबण्याऐवजी नांदेड येथे मुक्कामी थांबून हिंगोलीत अवघ्या दोन तासांसाठी येत होते. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली होती.
हिंगोलीत अतिवृष्टी नंतरही पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा केला नसल्याने ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून पालकमंत्र्यांना मोठा जिल्हा हवा असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मोठा जिल्हा द्यावा पण हिंगोलीसाठी सक्षम पालकमंत्री नियुक्त करावा अशी मागणी केली.
यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यानंतर पालकमंत्री झिरवाळ दोन दिवसीय जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, आता हिंगोली शहरात मंजूर झालेल्या दोन कोटी रुपयांच्या कामावरून भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. शहरात कामे मंजूर करतांना त्या ठिकाणी पाहणी करणे आवश्यक आहे. मात्र आवश्यकता नसतानाही पालकमंत्री झिरवाळ यांनी दोन कोटी रुपयांची कामे मंजूर केल्याचा आरोप आमदार मुटकुळे यांनी केला आहे.
या प्रकरणी आमदार मुटकुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठविले आहे. ज्या ठिकाणी कामे मंजूर केली त्या ठिकाणी रस्ते, नाल्या व इतर नागरी सुविधांची कामे आवश्यक असतांना दोन कोटी रुपयांची इतर कामे मंजूर केल्याचे पत्रात नमूद केले. सदर कामांना स्थगिती देण्याची मागणी आमदार मुटकुळे यांनी केली आहे. या प्रकरणात आता मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्र्यांकडून परस्पर कामे मंजूर होत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आता लोकप्रतिनिधींनी उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील काळात पालकमंत्री बदलाच्या मागणीला जोर येणार असल्याचे बोलले जात आहे.
हिंगोलीला कायम उपरा पालकमंत्री मिळत आला आहे. परिणामी, जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली. काही अपवाद वगळता जिल्ह्याचे पालकमंत्री केवळ ध्वजारोहणासाठीच येऊन जिल्हा नियोजनाच्या बैठका घेण्याचा सोपस्कार पूर्ण करतात. सध्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे देखील झेंडा मंत्र्यांच्याच पंगतीत येऊन बसले आहेत. जिल्हा मागासलेला असून देखील जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले जात नसल्याने विद्यमान पालकमंत्र्यांविरोधात लोकप्रतिनिधींसह सामान्य जनतेचा देखील रोष वाढतो आहे.