Dharashiv Political Paranda constituency political equation
भूम, पुढारी वृत्तसेवा लोकांच्या हितासाठी परंडा विधानसभा मतदारसंघात राजकारणाचा भूगोल मोठ्या वेगाने बदलताना दिसत आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर अनेक राजकीय उलथापालथी अनुभवल्या गेलेल्या या मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांच्या हालचालींनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे समीकरण स्पष्ट होऊ लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच माजी आमदार राहुल मोटे यांनी शनिवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या संवाद निवासस्थानी सदिच्छा भेट देत एक प्रकारे राजकीय बॉम्बच टाकला. या भेटीत आमदार ठाकूर यांनी आत्मीयतेने शाल, पुष्पहार देऊन मोटे यांचे स्वागत केले.
या क्षणांचे छायाचित्र सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होताच परंड्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा भडका उडाला आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून अवघ्या पंधराशे मतांनी पराभव पत्करला होता. मात्र त्यांनी नंतर शरद पवार गटाची साथ सोडत अजित पवार गटाचे 'घड्याळ' हाती घेतले.
त्यांच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला परंडा परिसरात मोठा राजकीय झटका बसल्याचे बोलले जात आहे. नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना महायुतीतील दोन प्रभावशाली नेते ठाकूर आणि मोटे यांच्या या भेटीमुळे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही भेट केवळ सदिच्छा नसून परंडा मतदारसंघातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या आगामी स्थानिक आघाडीची ही नांदी असू शकते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते संवाद साधत असल्याने महायुती आता "एकला चलो रे" ची भूमिका न घेता एकत्रित ताकदीने विरोधकांना आव्हान देणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ही भेट परंडा मतदारसंघातील भविष्यातील राजकारणाची दिशा आणि महायुतीच्या स्थानिक आघाडीचे स्वरूप यावर निर्णायक प्रकाश टाकणारी ठरली आहे.