Woman ends life after cheating sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : समाज कल्याण अंतर्गत शालेय साहित्याचे वाटपसाठी संस्थेत भागीदारीचे आमिष दाखवून तरुणासह त्याच्या सावत्र आईला एकाने जाळ्यात ओढले. चार तोळे दागिन्यांसह रोख असे साडेसहा लाख रुपये घेतले. मात्र पैसे, सोने परत मागताच शिवीगाळ, धमक्यांमुळे महिलेने विषारी औषध प्राशन केले.
उपचारादरम्यान ७ ऑक्टोबरला मनीषा संजय पांडे (३२) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी रवींद्र प्रेमनाथ बोर्डे (३६), अनुपम प्रेमनाथ बोर्डे (४०, दोघे रा, नवी देवळी, गंगापूर) या आरोपींना विमानतळाजवळ बहिणीच्या घरातून अटक केली. तर ज्योती रवींद्र बोर्डे ही फरार झाली आहे.
फिर्यादी आकाश संजय पांडे (२६, रा. पोलिस कॉलनी, श्रीपाद कॉलनी, हर्सेल) याच्या तक्रारीनुसार, तो कंपनीत काम करतो. सावत्र आई मनीषा, वडील संजय मांच्यासोबत तो राहतो. आरोपी बोर्ड २०१७ पासून सहा वर्ष भाडेकरू होता. रवींद्र हा कामगार कल्याण आयुक्तालयात शासकीय योजनेचे फॉर्म भरून देण्याचे काम करतो. त्याने संस्था सुरु करून समाज कल्याण मार्फत मुलांना साहित्य वाटपाचा व्यवसाय करू, असे आमिष दाखविले.
आकाश व त्याच्या आईने १ लाख ४४ हजार दिले. एप्रिल २०२३ मध्ये रवींद्रने प्रारंभ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सुरु केली. मात्र, ९ महिन्यातच पैसे बुडाल्याचे सांगितले. सप्टेंबर २०२४ मध्ये रवींद्रने नवीन व्यवसायासाठी म्हणून सहा तोळ्यांचे दागिने मनीषा पांडे यांच्याकडून घेतले. त्यानंतर २५ फेब्रुवारी २०२५ रोजी रवींद्रने लग्न असल्याचे सांगून पुन्हा पैसे मागितले. त्याला आकाशने कर्ज काढून २ लाख दिले. त्यानंतर आकाश आणि मनीषा यांनी वारंवार बोर्डेच्या घरी जाऊन सोने आणि पैसे परत करण्याची मागणी केली.
तेव्हा तिन्ही आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिल्याने मनीषा तणावात गेल्या. १९ सप्टेंबर रोजी रवींद्र घरी आला त्याने दोन दिवसांत तुमचे सोने आणि पैसे परत करतो, असे मनीषा यांना सांगून गेला. मात्र, त्याने पैसे न दिल्याने मनीषा यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुसाईड नोट सापडली रवींद्र सोने आणि पैसे देत नाही. अनुपान, रवींद्रच्या पत्नी या तिघांनी शिवीगाळ करून मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असलयाची चिठ्ठी त्यांच्या गाऊनमध्ये डॉक्टरांना सापडली. त्यावरून बेगमपुरा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. अधिक तपास उपनिरीक्षक मदेवाड करत आहेत.