गौवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले file photo
छत्रपती संभाजीनगर

गौवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले

पुढारी वृत्तसेवा

सिल्लोड : बोलेरो पिकअप गाडीतून गौवंश जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी पकडले. ही कारवाई शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास शहरालगत असलेल्या स्मशानभूमी जवळ करण्यात आली.

पोलिसांनी सात जनावरे, पिकअप गाडी असा ऐकून ६ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शेख रमजानी शेख सिकंदर (३५), शेख अशपाक शेख चांद (३०) दोघे रा. बोरगाव सारवणी अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

शहर ठाण्याचे पोलिस गस्त घालत असताना बोलेरो पिकअपमध्ये (एमएच २०, जीसी ०९६५) ईदगाहकडून छत्रपती संभाजीनगरकडे गौवंश जातीचे जनावरे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शहरातील छत्रपती संभाजीनगर नाक्यावर सदर गाडी दिसताच पोलिसांनी हाक दिली. मात्र, चालकाने गाडी थांबली नाही. पोलिसांनी पाठलाग करीत स्मशानभूमी जवळ गाडी पकडली.

तपासणी केली असता त्यात गौवंश जातीची सात जनावरे निर्दयीपणे कोंबलेल्या अवस्थेत दिसून आली. पोलिसांनी जनावरे, गाडी जप्त करीत दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सदर जनावरे पळशी येथील गौ शाळेत पाठवली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी मंगलसिंग लोदवाल यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका. वरपे करीत आहेत.

कत्तलीसाठी जात होती जनावरे

पोलिसांनी हाक देऊनही आरोपींनी गाडी थांबवली नाही. पोलिसांनी पाठलाग करुन पकडले व जनावरांची सुटका केली. गाडीतील जनावरे कत्तलीसाठी जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाबु मुंढे, पोलिस हेडकॉन्स्टेबल मंगलसिंग लोदवाल, मिरी यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT