Six houses broken into in one night, Sillod: Incident in Pimpalgaon Peth, police inspect
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा एकाच रात्री चोरट्यांनी तब्बल सहा घरे फोडली. ही घटना तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथील गणेशवाडी शेतवस्तीवर शनिवारी (दि.११) रात्री घडली. दरम्यान चोरट्यांनी घरातील लोखंडी पेट्यातील साहित्य अस्ताव्यस्त केले. मात्र हाती काहीच लागले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पिंपळगाव पेठ येथील काही शेतकरी गणेशवाडी शेतवस्तीवर राहतात. शनिवारी रात्री चोरट्यांनी विश्वास बंडू भोसले, लिंबा दिवटे, गणपत दिवटे, दादाराव भागवत, सांडू भोसले, एकनाथ दिवटे यांची घरे फोडली. रविवारी (दि. १२) सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक लहू घोडे, बीट जमादार दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत खातरजमा केली.
चोरट्यांनी घरातील लोखंडी पेट्या घरातून शेतात आणून फोडल्या. शिवाय कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले. मात्र चोरट्यांच्या हाती एका शेतकऱ्याचे रोख पाच हजार वगळता काहीच लागले नाही. दरम्यान एकाच रात्री सहा घरे फोडल्याने शेतवस्तीवरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या चोरीच्या घटनांप्रकरणी कुणी तक्रार न दिल्याने ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती.