Sambhajinagar Work order for arch given even though road widening will be done
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराची लाईफलाईन असलेला जालना रोड सेव्हनहिल ते केंब्रीज शाळा चौकापर्यंत १८० फूट रुंदीचा होणार आहे. त्यात सर्व्हिस रोडचाही समावेश राहणार असून, काही ठिकाणी उड्डाण-पूलही होणार आहेत. ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना असतानाही तब्बल ७ कोटी खर्चाच्या कामाची जूनमध्ये वर्क ऑर्डर दिली अन् कंत्राटदारानेही तातडीने कमान उभारणीचे कामही सुरू केले. आता रस्ता रुंदीकरणाचे निमित्त पुढे करीत महिनाभरापासून काम बंद केले आहे. त्यामुळे कमान उभारणीची घाई सात कोटी भुईसपाट करण्यासाठीच होती का, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिका प्रशासनाने जुन्या आणि नव्या शहर विकास आराखड्याची अंमलबजावणी करीत शहराच्या प्रमुख ५ प्रवेशद्वारांचा दबलेला श्वास मोकळा करण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रशासनाने सर्वप्रथम बीड बायपास रस्त्यावर धडक मोहीम राबवून सुमारे पाचशेहून अधिक बेकायदा बांधकामे भुईसपाट केली. त्यानंतर मुकुंदवाडीतील खुनाच्या घटनेचा आधार घेत जालना रोडवर सेव्हनहिल ते केंब्रीज शाळा चौक रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मोहीम राबविली.
ही कारवाई जून महिन्यात करण्यात आली. या मोहिमेची माहिती महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागासोबतच राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनाही दिली. दरम्यान, या रस्त्यांवर सर्व्हिस रोड महापालिका करेल आणि उर्वरित मुख्य रस्त्याचे रुंदीकरण हे संबंधित विभागांनी करावे, असेही त्या त्या विभागांच्या अभियंत्यांना सांगण्यात आले होते.
मात्र या संधीचा लाभ उचलण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रचला आणि कमान उभारणीच्या कामाचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) जुलै महिन्यात दिले. विशेष म्हणजे केंब्रीज चौकत सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या रुंदीनुसारच या कमानीचे काम सुरू केले अन् लगेच दोन महिन्यांत अर्ध्याहून अधिक काम पूर्णही केले. मागील महिनाभरापासून हे काम आता बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले असून, अधिकाऱ्यांच्या या मनमानीपणामुळे आता शासनला कोट्यवधींचा भुर्दंड सहन करावा लागेल, अशीही चर्चा सुरू आहे.
मर्जीतील कंत्राटदारासाठी घाट
हे काम अर्ध्यातच बंद करावे लागेल, ही माहिती असल्यामुळेच या कमानीचे काम बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी मर्जीतील कंत्राटदाराला दिल्याची चर्चा आहे. त्यामुळेच तातडीने कार्यारंभ आदेश दिले अन् कंत्राटदारानेही तेवढ्याच गतीने कामही सुरू केल्याचे बोलले जात आहे.
नियोजित उड्डाणपुलामुळे ब्रेक या कमानीच्या कामाची निविदा मंजुरी वर्षभरापूर्वीची होती. संपूर्ण प्रक्रियेला बराच कालावधी लागतो. त्यामुळेच हे काम जून, जुलैमध्ये सुरू झाले. मात्र महापालिका आणि स्मार्ट सिटीने या रस्त्यासाठी नवा डीपीआर तयार केला असून, त्यात या कमानीच्या ठिकाणी उड्नुणपुलाचे नियोजन असल्याने हे काम तूर्तास थांबविले आहे.शेषराव चव्हाण, कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी