छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या ५ गृहप्रकल्पांच्या कामांना अखेर ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात २४ हेक्टरमध्ये ११ हजार १२० सदनिकांचे प्रकल्प राबविले जात आहे. त्यासोबतच आता प्रधानमंत्री आवास योजना २.० साठी मनपाकडून हसूल आणि चिकलठाणा परिसरातील ३६ हेक्टर जागेची मागणी महसूल विभागाकडे करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी नव्या गृहसंकुलांची उभारणी करण्यात येणार असून, या जागेत किमान १५ हजारांवर सदनिका उभारणे शक्य होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या पीएम आवास योजनेच्या फेज १ अंतर्गत पडेगाव, सुंदरवाडी, हर्सल आणि तीसगाव येथील प्रकल्पांत एकूण ११,१२० घरांचे बांधकाम सुरू आहे. पडेगाव गट क्र.६९, सुंदरवाडी गट क्र.९ व १०, तीसगाव गट क्र. २२५/१ आणि २२७/१ तसेच हर्सल गट क्र. २१६ येथे हे प्रकल्प आकार घेत आहेत. या ठिकाणी कामासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली असून सुंदरवाडीत आरोथ्रॉन कन्स्ट्रक्शन, तिसगावात सहकार जेव्ही आणि एलोरा कन्स्ट्रक्शन, पडेगाव येथे लक्ष्मी जे. व्ही तर हरसूल येथे सारा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
फेज १ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी लाभार्थीची निवड म्हाडाच्या धर्तीवरील ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे.. यासाठी प्रोबीटी सॉफ्टवेअर प्रा. लि. या संस्थेची नेमणूक करण्यात आली असून, नोव्हेंबर महिन्यात या लॉटरीची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच फेज २ अंतर्गत हसूल आणि चिकलठाणा या भागात नवीन प्रकल्प राबविले जाणार आहेत. या विस्तारासाठी महसूल विभागाकडे एकूण ३६.४४ हेक्टर जागेची मागणी करण्यात आली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
किमान 15 हजार घरे होतील
महापालिकेला पीएम आवास योजनेत प्राप्त झालेल्या अर्जानुसार किमान ४० हजार घरे उभारावी लागणार आहेत. त्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणखी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता महापालिकेला लवकरच हसूल आणि चिकलठाणा परिसरातील ३६ हेक्टर गायरान जागा उपलब्ध होणार आहे. या जागेत किमान १५ हजारांहून अधिक घरे बांधण्याची महापालिकेची तयारी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पहिल्या टप्प्यातील १११२० घरे
हसूल गट नंबर २१६ मध्ये ५०४ सदनिका, पडेगाव गट नंबर ६९ मध्ये ६७२, सुंदरवाडी- गट नंबर ९ आणि १० मध्ये ३२८८, तीसगाव गट नंबर २२५/१ मध्ये १९७६, तर तीसगाव गट नंबर २२७/१ मध्ये ४६८० सदनिकांचे काम अंतिम टप्यात आहे.
जागेचा तपशील : हरसुल गट क्र.२१५/१, ७.६४
हेक्टर, हर्मूल गट क्र.२३५ - ६.८६, चिकलठाणा गट क्र. २३३ मध्ये ५.३४ तर चिकलठाणा गट क्र.२४२ - ७.३६ व चिकलठाणा गट क्र. २३६ ९.२४ हेक्टर जागा.