खाद्यतेल किंमती file photo
छत्रपती संभाजीनगर

Food Oil Prices | ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेल कडाडले

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दसरा- दिवाळीच्या तोंडावर शहरातील खाद्य तेल बाजारात पुन्हा तेजी निर्माण झाली आहेत. केंद्र सरकारने कच्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्याने खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेलाचे भाव लिटरमागे २१ रुपयांनी वधारल्याचे खाद्यतेल विक्रेत्यांनी सांगितले. करडी, शेंगदाणा आणि सरकी तेलही प्रतिलिटर दहा रुपयांनी महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने गतवर्षी कच्च्या तेलावरील आयात शुल्क रद्द केले होते. त्यामुळे गगनाला भिडणाऱ्या खाद्यतेलाच्या किमती हळूहळू खाली घसरल्याने गृहिणीसह हॉटेलचालकांना मोठा दिलासा मिळाला होता, जवळपास वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किमती स्थिर होत्या. मात्र, दरवर्षी सणासुदीत तेलाची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे तेल बाजारात तेजी येते. सध्या दसरा-दिवाळी तोंडावर आली असताना केंद्राने कच्चे सूर्यफूल, कच्चे पाम तेल आणि कच्चे सोयाबीनवरील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढवले आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत.

सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाच्या किमती लिटरमागे २१ रुपयांनी बाढल्या असून, करडी, शेंगदाणा, सरकी, सरसो भाव देखील १० ते १९ तेलाचे रुपयांनी वाढल्याचे तेल विक्रेत्यांनी सांगितले. दरवर्षी सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेल दरवाढीचा भडका उडतो, हे काही नवीन नाही. मात्र लिटरमागे तब्बल २० ते ३० रुपयांच्या दरवाढीने चटका बसला आहे. याचा महिन्याच्या बजेटवर परिणाम जाणवत आहे.

आयात शुल्क वाढीचा परिणाम

केंद्र सरकारने कच्चे तेलावरील आयात शुल्क वाढल्याने सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाच्या किमतही वाढल्या आहेत. इतर करडी, शेंगदाणा आणि सरसो तेलही महागले आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
-किशोर मिटकर, खाद्यतेल व्यापारी.
खाद्यतेल महागले सोयाबीन, सूर्यफूल, पामतेलाचे भाव प्रतिलिटर २१ रुपयांनी वाढले आहे. आयात शुल्क वाढ होईपर्यंत तिन्ही तेल प्रतिलिटर १०४ रुपये दर होते. आता १२५ रुपये प्रतिलिटरवर गेले आहेत. करडी, शेंगदाणा आणि सरकी तेलच्या किमतीदेखील १० रपयांनी वाढल्या आहेत.
- अभिषेक मकरिये, खाद्यतेल विक्रेता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT