वृद्धावर दारुड्याने अनैसर्गिक अत्याचार केला 
छत्रपती संभाजीनगर

संतापजनक! फूटपाथवरील वृद्धावर दारुड्याचा अनैसर्गिक अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका हॉटेलच्या परिसरात झोपलेल्या ७९ वर्षीय वृद्धावर एका दारुड्याने अनैसर्गिक अत्याचार केला. प्रतिकार करताच त्यांच्याकडून १ हजार रुपये हिसकावून दारुड्याने त्यांच्या अंगावर लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी (दि.२१) रात्री घडला. याप्रकरणी सिडको पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. विक्रम ऊर्फ भुऱ्या धरमसिंग राजपूत (रा. सेवनहिल उड्डाणपुलाखाली) असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, पीडित ७९ वर्षीय वृद्धाला मुलगा नाही. मुलगी आणि जावई मुकुंदवाडी भागात राहतात. वृद्धाची पत्नी मुलीच्याच घरी राहते. दरम्यान, मुलगी आणि जावयासोबत पटत नसल्यामुळे वर्षभरापूर्वी वृद्धाने घर सोडले. तेव्हापासून ते बाहेरच भीक मागून खातात आणि रात्री जागा मिळेल तेथे अंथरुण टाकून झोपी जातात. २१ सप्टेंबरच्या रात्री ते शहरातील एका हॉटेलच्या परिसरात झोपी गेले. हॉटेलची गर्दी ओसरल्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी विक्रम ऊर्फ भुऱ्या दारूच्या नशेत तेथे आला. तेव्हा पीडित वृद्ध आणि आणखी एक असे दोघे तेथे झोपलेले दिसले. आरोपीने दोन्ही वृद्धांना मारहाण केली. त्यामुळे दुसरा वृद्ध तेथून निघून गेला. आरोपीने पीडित वृद्धाला पकडले. व त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. वृद्धाने प्रतिकार करताच त्यांच्याकडील १ हजार रुपये हिसकावून घेतले. शेवटी वृद्धाच्या अंगावर लघुशंका केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक नितीन कामे, उपनिरीक्षक प्रमोद देवकते हे पथकासह घटनास्थळी आले. त्यांनी तात्काळ वृद्धाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. त्यांचा जबाब नोंदविला. सीसीटीव्ही फुटेज आणि पीडित वृद्धाने केलेल्या वर्णनावरून आरोपी निष्पन केला आणि लगेचच त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी सिडको ठाण्यात लुटमार आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक प्रमोद देवकते करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT