Food Poisoning in Gangapur
गंगापूर: गंगापूर तालुक्यातील कोडापूर येथे शिळा भात खाल्ल्याने एका कुटुंबातील सहा बालकांसह एका महिलेला विषबाधा झाली. ही घटना मंगळवारी घडली. सर्वांना तत्काळ गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय खंडागळे हे आपल्या कुटुंबासह कोडापूर येथे वास्तव्यास आहेत. २ जूनच्या रात्री घरात उरलेला भात दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ला गेला. सकाळी सुमारे ८.३० च्या सुमारास खाल्ल्यानंतर अर्ध्या तासात घरातील लहान मुलांना उलट्या व जुलाब होण्यास सुरुवात झाली.
विषबाधा झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे -खंडागळे (वय ६), आदर्श सोमनाथ खंडागळे (५), आदेश सोमनाथ खंडागळे (८), दिपक विजय खंडागळे (५), अनुष्का विजय खंडागळे (७), दिव्या विजय खंडागळे आणि पुष्पा बळीराम खंडागळे (वय ४०). सर्वांनी शिळा भात खाल्ल्यानंतर तब्येत बिघडल्याने त्यांना तत्काळ गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्वांवर उपचार करण्यात आले. विषबाधेचे नेमके कारण अन्न दूषित झाल्यामुळे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेची नोंद गंगापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस हवालदार अमित पाटील पुढील तपास करत आहेत.