सव्वा तासाच्या विमान प्रवासात डॉक्टर महिलेची पाचवेळा छेड file photo
छत्रपती संभाजीनगर

सव्वा तासाच्या विमान प्रवासात डॉक्टर महिलेची पाचवेळा छेड

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : राज्यभर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना दिल्लीहून छत्रपती संभाजीनगरला आलेल्या विमानात एका खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाने सहप्रवासी महिला डॉक्टरची छेड काढली. महिला डॉक्टर बसलेल्या सीटच्या पाठीमागून हात घालून 'बॅड टच' केला. एक-दोन वेळा महिलेने दुर्लक्ष केले, मात्र आरोपीने चार ते पाच वेळा हा प्रकार केल्यामुळे या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २ सप्टेंबरला इंडिगो विमानात ही घटना घडली.

आसिफ खान अन्वर अहमद (३९, रा. उत्तरपूर्व दिली, ह.मु. बारी कॉलनी, कटकटगेट, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव असून, तो गिब्ज कंपनीत व्यवस्थापक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक माहितीनुसार, ५५ वर्षीय पीडिता डॉक्टर आहे. त्या कुटुंबीयांसह पर्यटनाला गेल्या होत्या. २ सप्टेंबरला त्या दिल्लीहून छत्रपती संभाजीनगरला इंडिगो विमानाने प्रवास करीत असताना त्यांच्या पाठीमागील सीटवर आरोपी आसिफ खान बसलेला होता. दिल्लीहून विमान निघाल्यावर प्रवासादरम्यान आसिफने डॉक्टर महिला बसलेल्या सीटच्या मागील बाजूने हात घालून त्यांना नकोसा स्पर्श केला. सुरुवातीला चुकून हात लागला असेल, असे समजून डॉक्टर महिलेने दुर्लक्ष केले. मात्र, आसिफने पुन्हा तशाच प्रकारे बॅड टच केल्यामुळे डॉक्टर महिलेला संशय आला. त्या काहीशा सावरून बसल्या. त्यावर आरोपी आसिफ खान याने डॉक्टर महिलेचे शर्ट वर करून त्यांच्या अंगाला हात लावला.

हे प्रकरण एमआयडीसी सिडको ठाण्यात गेल्यावर पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक राधा लाटे यांनी डॉक्टर महिलेची तक्रार नोंदवून घेतली. त्यावरून आसिफविरुद्ध बीएनएस कलम ७५ (१) नुसार गुन्हा दाखल केला. त्याची सुमारे पाच तास चौकशी केली. अखेर नोटीस बजावून त्याला सोडण्यात आले.

उतरताच ११२ वर कॉल

आरोपी आसिफ खान हा छेड काढत असल्याचा प्रकार महिलेने लगेचच शेजारी बसलेल्या पतीला सांगितला. छत्रपती संभाजीनगरात चिकलठाणा विमानतळावर विमान उतरताच त्यांनी डायल ११२ ला कॉल केला. एमआयडीसी सिडको ठाण्याचे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच महिला डॉक्टरसह आरोपी आसिफ खानला ठाण्यात नेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT