Chhatrapati Sambhajinagar news
छत्रपती संभाजीनगर : दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा होऊन हाणामारी झाली. परिसरात शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला होता. ही घटना गुरुवारी (दि.३) मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान सूतगिरणी चौकात घडली. यात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या राड्यात एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सूतगिरणी चौकात मध्यरात्री मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही तरुण एकत्र आले होते. पार्टी सुरू असताना तिथे दुसऱ्या गटातील काही तरुणाशी त्यांचा वाद झाला. दुचाकीचा कट लागल्यावरून हा वाद आणखी उभाळून आला. दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. दुसऱ्या गटातील शेकडोंचा जमाव काही वेळातच परिसरात जमला. बर्थडे करणाऱ्या तरुणांवर तुटून पडला. जवाहरनगर आणि पुंडलिक ठाण्यातील पोलिस, वरिष्ठ अधिकारी, दंगा काबू पथकासह घटनास्थळी आले. पोलिसांनी जमाव पांगविला. जखमी तरुणाला घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त रणजीत पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार रात्री उशिरा पर्यंत जवाहर नगर पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते.
शेकडोंचा जमाव जमल्याने जवाहर नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ताब्यात घेतलेल्या काही जणांकडून धारदार शस्त्रे जप्त केली आहे. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पोलिस ठाण्यात आले होते. ठाण्याच्या बाहेर रात्री उशिरापर्यंत दोन्ही कडील मोठा जमाव जमलेला होता. एक गट काही अंतरावर उभा होता.