शाळकरी विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या हायवाला संतप्त नागरिकांनी पेटवून दिले. इन्सेटमध्ये हायवाने चिरडलेला मयत मुलगा. Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar | सुसाट हायवा अजून किती बळी घेणार?

स्वालिया न. शिकलगार

वैजापूर- काल गंगचडी परिसरातील रस्त्यावर ११ वर्षीय निष्पाप शाळकरी विद्यार्थ्याला भरधाव हायवाने चिरडले. अपघाता नंतर परीसरात वाळू माफियासह प्रशासनावर संतापाची लाट उसळली असून सुसाट हायवा अजून किती बळी घेणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात वीरगाव पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गोदावरी नदीपात्रातून ३० हजार ब्रास वाळूचा साठा पुरवठा करण्याचे कंत्राट प्रशांत अंभोरे यांच्या कंपनीने घेतले आहे. वैजापूर तालुक्यातील नागमठाण, पुरणगाव, भालगाव आणि अव्वलगाव अशा चार ठिकाणाहून ३० हजार ब्रास वाळु उत्खनन करण्याची मुदत ९ जून पर्यंत होती. कंत्राटदाराने उत्खनन केलला वाळू साठा नदीपात्रा बाहेर काढून बाभुळगाव गंगा येथे केला आहे. येथून हायवाद्वारे छत्रपती संभाजीनगर येथे काम सुरु असलेल्या ठिकाणी पोहचविण्याचे काम सुरु होते. ३० सप्टेंबर पर्यंत वाहतूक परवानगीची मुदत असल्याने कंत्राटदाराकडून दिवस-रात्र हायवातून वाळू वाहतूक केली जात आहे.

या भरधाव हायवामुळे ११ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अपघात घडल्यानंतर हायवा चालक पळून गेल्याने संतप्त झालेल्या नागरिकांच्या जमावाने हायवा पेटवून दिला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी वीरगाव तसेच वैजापूर पोलिसांचा फौजफाट तैनात करण्यात आला होता. पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले होते. तसेच रात्री उशिरा आरोपीविरुद्ध मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अजीम अब्दुलरहेमान शेख. (३०, रा. कोरेगाव ता. गंगापूर) या आरोपीला राहत्या घरून अटक केली. दरम्यान हायवा चालकाच्या चुकीमुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला. संबंधितावर योग्य कारवाई व्हावी हीच अपेक्षा. अशी दुर्दैवी वेळ कोणावरही येवू नये.

अनेकदा बचावले विद्यार्थी

वाळू वाहतूक करणारे हायवा चालक वेगाची मर्यादा पाळत नाहीत. गर्दीतूनही सुसाट हायवा पळवितात्त. अनेकदा हायवाच्या हुलकावणीमुळे शाळकरी विद्यार्थी अपघात होण्यापासून बच्याचदा बचावले आहेत. अशी माहीती शाळेतील शिक्षकांनी दिली. तसेच वीरगाव पोलिसांना बेळोवळी तक्रार करूनही पोलीसांनी हायवाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला.

ग्रा.पं. कडून तातडीने ग्रामसभा या संतापजनक घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत तत्काळ शनिवारी सकाळी १० वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेत नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत यापुढे गावातून वाळू वाहतूक करणाऱ्या हायवासाठी पर्याय मार्ग निवडावा. तसेच गावात स्पीड ब्रेकर टाकावे. आदी मुद्यांवर ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आले. या ग्रामसेभेला मोठ्या प्रमाणत नागरीक उपस्थित होते,

कंत्राटदारामुळे वाढली मुजोरी

गोदावरी नदीपात्रातून पाणीपुरवठा योजनेला वालु पुरवठा करण्याचा ठेका घेतलेल्या कंपनीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा राजकीय वरदहस्त लाभलेले आहे. कंपनीच्या नावाखाली एक राजकीय पक्षाचा पदाधिकारी बाळु उत्खनन व वाहतूक करण्याचे काम सर्व नियम धाब्यावर बसवून करत असल्याची तक्रार अनेक वेळा नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र याची दखल घेतली गेली नाही. केवळ खाबुगिरी वृत्तीमुळे विद्यार्थ्यांचा जीव गेला. कंत्राटदारामुळे या सर्व हायवा चालकांची मुजोरी वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT