Board Secretary Vaishali Jamdar suspended
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या विभागीय सचिव डॉ. वैशाली जामदार यांना निलंबित करण्यात आले आहे. नागपूर पोलिसांनी जामदार यांना बोगस शालार्थ आयडी प्रकरणात २३ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर आता शिक्षण विभागाने त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.
नागपूर विभागात मोठ्या प्रमाणावर बोगस शिक्षक भरती झाल्याचे उघडकीस आले आहे. नागपूरच्या तत्कालीन शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांच्या कार्यकाळात हा घोटाळा झाला होता. या प्रकरणात योग्य प्रक्रिया न करताच शालार्थ आयडी देण्यात आल्या होत्या. नागपूर पोलिसांनी काही महिन्यांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
जामदार या दीड वर्षापासून छत्रपती संभाजीनगर येथे एसएससी बोर्डात सचिवपदावर कार्यरत आहेत. त्यांना नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. परंतु त्यांनी विविध कारणे देत चौकशीला हजर राहणे टाळले. त्यामुळे नागपूर पोलिसांनी २३ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून जामदार यांना अटक केली. त्या आतापर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान, शिक्षण विभागाने आता जामदार यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश बोर्डाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयास चार ते पाच दिवसांपूर्वीच प्राप्त झाले आहेत. बोर्डाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी या निलंबन आदेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला. जामदार यांना अटक झाल्यापासून बोर्डाच्या सचिवपदाचा अतिरिक्त पदभार बोर्डातील उपसचिव प्रियाराणी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.