Beed accident news Pudhari Photo
बीड

Beed accident news: शिवशाहीच्या धडकेत तरुण रिक्षाचालकाचा बळी, संतप्त जमावाकडून बसची तोडफोड

Beed Shivshahi bus rickshaw collision: बीडहून नांदेडकडे निघालेल्या भरधाव शिवशाही बसने रिक्षाला जोरदार धडक दिल्यानंतर संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक करत तिची तोडफोड केली, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ: तालुक्यातील पांगरी तांडा परिसरात आज (दि.१) सकाळी एका भीषण अपघातात २३ वर्षीय रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. बीडहून नांदेडकडे निघालेल्या भरधाव शिवशाही बसने रिक्षाला जोरदार धडक दिल्यानंतर संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक करत तिची तोडफोड केली, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघात नेमका कसा घडला?

शुक्रवारी (दि.१) सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. श्रीनिवास शिवाजी राठोड (वय २३, रा. पांगरी तांडा) असे मृत तरुण रिक्षाचालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास आपल्या रिक्षातून काही प्रवाशांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सोडून पांगरी रोडने आपल्या तांड्याकडे परतत होता. त्याचवेळी, बीडहून नांदेडकडे जाणाऱ्या शिवशाही बसने (एमएच ०४ एफएल ०९८८) त्याच्या रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिक्षा काही अंतर फरफटत गेली आणि श्रीनिवासचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतरचा तणाव

अपघाताची माहिती मिळताच पांगरी तांडा आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. आपल्या भागातील तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून जमाव संतप्त झाला आणि त्यांनी शिवशाही बसच्या काचा फोडल्या. या घटनेमुळे रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. बसमधील प्रवासीही भयभीत झाले होते, मात्र काहींनी पुढे येऊन मदत करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास

घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मजहर सय्यद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संतप्त जमावाची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT