बीड, पुढारी वृत्तसेवा बीड तालुक्यातील कपिलधारवाडी येथील भूस्खलनग्रस्त क्षेत्राची पाहणी भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या मेगो चासी व संदीपकुमार शर्मा यांनी पाहणी केली होती. त्यांनी आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला असून या परिसराला बहुआयामी धोका असून या भागात भूपृष्ठाखाली पाण्याची साठवण होत आहे, यामुळे भूस्खलनाची प्रक्रिया सुरु असून ती काही काळ पुढेही सुरू राहू शकते अशी शक्यता व्यक्त करत या भागाला बहुआयामी धोका निर्माण झाल्याचे देखील अहवालात म्हटले आहे.
बीड तालुक्यातील सोलापूर-धुळे महामार्गाजवळ असलेल्या डोंगर उतारावर वसलेल्या कपिलधारवाडी या गावाला भुस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. या भागातील जवळपास अर्धा किलोमीटरचा डोंगर आठ ते दहा फुट खचला असल्याने काही घरांना धोका निर्माण झाला तर उर्वरित गाव देखील रिकामे करावे लागले आहे. या ठिकाणच्या ऐशी कुटुंबांची व्यवस्था कपीलधार देवस्थान येथे करण्यात आली आहे.
दरम्यान, या परिसराची पाहणी भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचे मेगो चासी, संदिपकुमार शर्मा यांनी केली. यामध्ये त्यांनी दिलेल्या प्राथमिक निरी-क्षणानुसार संबंधीत ठिकाणी पृष्ठभागावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी नैसर्गिक ड्रेनेज प्रणाली अस्तित्वात नाही, त्यामुळे विशेषतः बारीक मातीच्या तुकड्यांनी समृद्ध भागात पाण्याचे झिरपणे व भूपृष्ठाखाली साठवण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या कारणामुळे भूस्खलनाची प्रक्रिया सुरु असून ती काही काळ पुढेही सुरु राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली तसेच या भागाला बहुआयामी धोका निर्माण झाल्याचे त्यांनी नमुद केले असून मातीने झाकलेल्या उतारांवरुन घसरण होत आहे, काही ठिकाणी मागील उतारांवरुन दगड कोसळत आहेत, तर काही भागात नदीच्या प्रवाहामुळे जमिनीची धूप होत आहे.
या परिस्थितीमुळे मुसळधार पावसाच्या काळात बाधीत कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वस नकरण्याची आवश्यकता असल्याचे सूचित करण्यात आले. तसेच मान्सूनचा पाऊस कमी झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवता येईल तसेच स्लाईड क्षेत्राच्या तत्काळ जवळील तीन ते चार कुटुंब सर्वाधिक प्रभावित असल्याचे निरीक्षण देखील पथकाने नोंदवले.
तत्काळ धोका नाही
कपिलधारवाडी परिसरात भूस्खलनाची प्रक्रिया सुरू असली तरी उर्वरित गावाला तत्काळ धोका नसल्याचे मूल्यांकन भारतीय भूगर्भ सर्वेक्षण पथकाने केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आता त्या दिशेने उपाययोजना करत आहे.