परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : पुरावे नसताना बोगस जन्म दाखले देण्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील तीन ठिकाणी उघडकीस आला आहे. परळीतील महसूल प्रशासन यात आघाडीवर असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (दि. १५) केला. सोमय्या यांनी परळी पोलीस ठाण्यात तब्बल तीन तास ठिय्या मांडून तहसीलदार, नायब तहसीलदार, नगरपालिका प्रशासन आदी सर्व संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यावर याप्रकरणी दोन- तीन दिवसांत परळीत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला दिल्याचे सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. (Kirit Somaiya visit Beed)
सोमय्या हे आज (दि.१५) सकाळीच परळी दाखल झाले. परळीत जन्म दाखले देताना मोठ्या प्रमाणावर घोटाळे व बोगसगिरी झालेली आहे. 40-50 वर्षानंतर अनेकांना कुठलेही निकष न पाहता, कोणत्याही सुनावण्या न करता, पुरेसे पुरावे नसताना बिनधास्तपणे जन्म दाखले देण्यात आले आहेत. अशी 60-70 उदाहरणे सप्रमाण त्यांनी महसूल, नगरपालिका व पोलीस प्रशासनाला दाखवली. परळी वैजनाथ येथून जवळपास दाखल झालेल्या 1389 अर्जांपैकी केवळ 11 अर्ज हे फेटाळल्याचे दिसते. मात्र, जे 1378 अर्ज मंजूर करून जन्म दाखले जारी करण्यात आले आहेत. त्यात पुरेसे पुरावे नसल्याचे दिसते.
तसेच नगरपालिकचे प्रतिनिधी सुनावणीच्या वेळी हजर नसतानाही सुनावणीला हजर असल्याचे बहुसंख्य प्रकरणात नमूद करण्यात आलेले आहे. याबाबत परळीच्या तहसीलदारांनाही समाधानकारक अशा प्रकारचा खुलासा करता आलेला नाही. त्यामुळे बिनधास्तपणाने कोणतेही निकष न पाहता, पुरेसे पुरावे उपलब्ध नसतानाही बोगसगिरी करून तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी हे जन्म दाखले जारी केलेले आहेत, हे स्पष्ट होते.
या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची आपली मागणी होती. त्यासाठी आपण पोलीस प्रशासनाला पुराव्यासह गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांत याची चौकशी करून निश्चित गुन्हा दाखल होईल, असे आश्वासन आपल्याला परळीच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
दरम्यान, परळीत मोठ्या प्रमाणावर बोगसगिरी करून जन्म दाखले देण्यात आलेले आहेत. या पाठीमागे बोगसगिरी करणाऱ्या प्रत्येक संबंधितांला जबाबदार धरून सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. यामागे जे अधिकारी आहेत किंवा त्यांचे कोणी राजकीय गॉडफादर असतील त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.