बसमध्ये खाऊ देऊन गुंगी आल्यानंतर दागिने लंपास करणाऱ्या चोरास पकडले  
बीड

Beed News | बसमध्ये बिस्कीट-पाणी देऊन आणली गुंगी : लाखांचे दागिने पळवणारा चोर जेरबंद !

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ - परळी वैजनाथ येथून बसमध्ये प्रवास करत असताना दगडवाडीजवळ बसमधील एका महिलेला एका अनोळखी इसमाने चहा बिस्कीट दिले. त्यानंतर या महिलेला गुंगी आली. त्यानंतर या इसमाने महिलेच्या अंगावरील साडेतीन लाख रुपयांचे दागिने पळून नेल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी घडली होती. तपासाच्या दृष्टीने आव्हानात्मक असलेल्या गुन्ह्याचा परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी महिन्याच्या आत तपास केला. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील या चोराला मुद्देमालासहित जेरबंद करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कमल ज्ञानोबा सुरवसे (वय ५०, रा. बसवेश्वर कॉलनी परळी, ता. परळी, जि. बीड) महिला दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास परळी बसस्थानक प्रवास करत होती. नांदेड येथे जाण्यासाठी परळी ते नांदेड बसमधून प्रवास करत असताना बसमध्ये एका अनोळखी इसमाने या महिलेला बिस्कीट आणि पाणी दिले. पाणी पिल्यानंतर तिला चक्कर आली. गुंगी आल्यावर चोरट्याने त्यांच्या हातातील दागिने असा ३ लाख ६० हजार किंमतीचा मुद्देमाल काढून घेऊन फसवणूक केली. अशा प्रकारचा गुन्हा पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी जि. बीड येथे गुर नं १२४/२०२४ कलम ३१८(४), ३१९ (२) बीएनएस २०२३ प्रमाणे दाखल आहे.

या गुन्ह्याचा तपास वेगाने करत संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी परळी शहरात नवीन अद्यावत बसविलेल्या सी.सी.टी.व्ही कॅमेरेचे फुटेजच्या आधारे, तसेच सायबर सेल बीड यांची तांत्रिक मदत घेतली. गुन्ह्यातील अनोळखी आरोपी अमोल धोंडीबा मस्के (वय ५०, रा. बोधेगाव, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) याचा शोध लावला.

आरोपीकडून ३ लाख ५० हजार रूपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनजंय ढोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव, पोलिस उपनिरीक्षक अनिल शिंदे, पोलिस हवालदार नरहरी नागरगोजे, पोलिस कॉन्स्टेबल व्यंकट डोरनाळे, पोलिस कॉन्स्टेबल भगवान चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल शंकर डोंगळे आदींनी गुन्ह्याचा उलगडा करण्याची कामगिरी केली.

असा सापडला चोर

तपासाच्या दृष्टीने क्लिष्ट चोरीची ही घटना होती. मात्र, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास कामात अनुभवी असलेले पोलीस हवालदार नरहरी नागरगोजे यांनी या गुन्ह्यात तत्परतेने तपास केला. संभाजीनगर पोलीस ठाण्याचे डीबी इन्चार्ज नरहरी नागरगोजे यांनी काही काळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सेवा बजावलेली आहे. अशा प्रकारच्या घटना मधील जुन्या काही आरोपींबाबत त्यांना माहिती होती. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्यांनी आरोपीचा शोध घेण्याच्या दृष्टीने आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग केला. त्यामुळे या घटनेतील आरोपीपर्यंत पोलीस पोहोचू शकले.

या घटनेत चोर शोधण्यासाठी त्याचा संपर्क क्रमांक मिळवून त्याच्यापर्यंत पोहोचत सखोल तपासणी केली. चोराला पकडल्यानंतर त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून संभाजीनगर पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला. डीबी इंचार्ज नागरगोजे यांचा अनुभव व अन्य सर्व दुवे एकत्र जुळवत एक महिन्याच्या आत चोरीचा गुन्हा उलगडण्यात पोलिसांना यश मिळाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT