Shirur Bavi farmer death
शंकर भालेकर
शिरूर : चार पत्र्यांचा अडोसा घेऊन मोडक्या घरामध्ये परिस्थितीशी झुंज देणाऱ्या बळीराजाची वरूण राजाने मोठी कुचेष्टा केली अनं तीच कुचेष्टा बळीराजाच्या जिव्हारी लागली.कोंबडीच्या खुरड्यागत घर असलेल्या घरातील संसार अतिवृष्टीच्या पाण्याने गिळकृत केला. ना साठी झोपण्यासाठी जागा कोरडी राहिली ना अंगावरती घालायला कपडे.. पोटाला पीळ देऊन उभा केलेल्या तुटक्या संसाराची वरुण राजाने डोळ्या देखत माती केली.नशिबाच्या खेळावर जीवन जगणाऱ्या बळीराजाच्या जीवाला अतिवृष्टीचा मोठा धक्का लागल्याने ऐन दिवाळीतच बळीराजांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बावी येथे घडली आहे.
शिरूर कासार तालुक्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये मोठी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने तालुक्यातील सिंदफणा नदीसह उपनद्या नाले, ओढ्यांना मोठा पूर आला होता. या पुराचे पाणी नदी नाल्यांच्या पात्रामध्ये न मावल्याने नदीलगतच्या शेतामध्ये, घरामध्ये घुसून शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान केले आहे. यामध्ये अनेक शेतकरी बेघर झाले होते. अशीच हृदयाला पिळुन टाकणारी घटना तालुक्यातील बावी या गावांमध्ये घडली होती.
बावी येथील शेतकरी बबन आश्रुबा ढाकणे (वय 65) हा शेतकरी बोरीचामळा या शेतामध्ये आपले पत्र्याचे घर थाटून शेती करत होता. झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला नाल्याचे पाणी पाठीमागे फुगत आल्याने घरामध्ये आणि शेतामध्ये घुसले. शेतातील बाजरी कापूस आदी पिके तर जमीन दोस्त तर केलीच. पण घरातील संसार उपयोगी साहित्य याची डोळ्यात देखत माती केली. ना झोपायला जागा राहिली, ना स्वयंपाकाला घरातील असलेले धान्य तेही भिजून ओलाचिंब केले. याचा मोठा धक्का शेतकरी बबन आश्रुबा ढाकणे यांना लागला होता.
अतिवृष्टीने डोळ्यादेखत संसाराची माती केली झालेल्या नुकसानीमुळे आश्रुबा ढाकणे हे पुरतेच निराश झाले होते. घरामध्ये काही नाही आणि दिवाळीचा सण आला आहे. याच निराशेपोटी आश्रुबा ढाकणे यांनी रविवार (दि. 19) विषप्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. ही बाब घरच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने शिरूर कडे हलवण्यात आले. ढाकणे यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने गंभीर होत चालल्याने पुढील उपचारासाठी बीड येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते.
मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी (दि. 21) लक्ष्मीपूजनाच्या दीपोत्सवादिवशी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे ज्या घरांमध्ये दीपउत्सव करून अंधकार घालवायचा होता. त्याच घरामध्ये दीप उत्सवाच्या वेळी दुःखमय अंधार पसरला आहे. बबन ढाकणे पत्नी शहाबाई बबन ढाकणे, मुलगा संतोष बबन ढाकणे, गणेश बबन ढाकणे असे दोन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. सहा महिन्यापूर्वीच बबन ढाकणे यांचा दोन नंबरचा मुलगा सुरेश ढाकणे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या दुःखातून ढाकणे परिवार सावरतो ना सावरतो तोच हा दुर्दैवी दुःखाचा डोंगर ढाकणे परिवारावर पुन्हा एकदा कोसळा आहे.