नेकनुर: चौसाळाजवळ असणाऱ्या कानडी घाटच्या शिवारात ओ टू पॉवर हाऊस कंपनीच्या जबरदस्तीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना नेकनूर पोलिसांच्या कर्तबगारीचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी मोबदला मिळेपर्यंत काम न करण्याची भूमिका घेतल्याने या कंपन्याचे रखवालदार पोलीस तरुण शेतकऱ्याला चक्क कॅरेक्टर खराब करण्याची धमकी देऊन गेले. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच उघडे पडले असून नेकनूर पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कानडीघाट येथील गणेश ग्यानबा झोडगे आणि कृष्णा कुडके यांच्या 449 गट नंबर मधील शेतातून शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार कुठलाही मोबदला न देता या कंपनीने तार ओढली गेली. या ठिकाणी टावरचे काम करण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला असताना पोलिस बळाच्या जोरावर गुरुवारी या ठिकाणी ओ टू पॉवर कंपनीने काम सुरू केले. त्यावेळी या शेतकऱ्यांनी विरोध केला असता उपस्थित पोलीस कर्मचारी दत्तात्रय बळवंत, सचिन गर्जे ,सचिन मुरूमकर यांनी या तरुणाला तुझे कॅरेक्टर खराब करील अशी धमकी दिली.
या धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर रात्री उशिरा मोठ्या प्रमाणात वायरल झाला. यामुळे नेकनूर पोलिसांचा कारभार समोर आला आहे. मागच्या वर्षभरात नेहमीच या पवनचक्की आणि तार ओढण्याच्या कामाने नेकनूर पोलीस दमदाटी करीत असल्याचे व्हिडिओ पुढे येत आहेत.
आमच्या गट नंबर 449 मधून ओ टू पॉवर कंपनीने मोबदल्याची मागणी पूर्ण न करताच तारा ओढल्या आता मी बाहेरगावी असल्याचे समजतात. या ठिकाणी 22 के वी टॉवरचे काम हाती घेतले. माझ्या भावाने व कुटुंबीयांनी याला विरोध दर्शवला आणि यूपीएससीची तयारी करत असल्याचे सांगितले असता, पोलिसांनी कॅरेक्टर खराब करण्याची धमकी दिली त्यामुळे पोलीस नेमके कशा पद्धतीने वागतात हे समोर आले आहे. या प्रकरणी वरिष्ठ काय कारवाई करतील हे आता पाहावे लागणार आहे?विजय झोडगे, शेतकरी कानडी घाट
अज्ञात व्यक्तीकडून संबंधित ठिकाणी टॉवरचे बोल्ट काढले जात होते. आम्हाला कंपनीने माहिती दिल्याने हे टॉवर कोसळून जीवित हानी घडू नये म्हणून पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी गेले होते. यावेळी पोलिस, शेतकऱ्यात बाचाबाचीचा प्रकार घडला. शेतकऱ्यावर कुठलाही दबाव टाकला नाही. शेतकऱ्यांना पोलिसांचे सहकार्यच राहील.सपोनी. चंद्रकांत गोसावी, पोलीस स्टेशन नेकनूर