अंबाजोगाई: शहरातील दोन अवैध मटका व जुगार चालकांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून, त्यांना हर्सूल कारागृहात रवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गुन्हेगारी, गुंडगिरी आणि वाळू माफियांचे निर्मूलन करण्याचा निर्धार केला आहे.
पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांनी १८ सप्टेंबर रोजी सय्यद अन्वर सय्यद अजगर (वय ४१, रा. खत्तीब गल्ली) आणि चांद इमाम गवळी (वय ४४, रा. गवळीपुरा) या दोघांविरुद्ध प्रस्ताव सादर केला होता. दोघांवर अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात कल्याण व मिलन मटका चालविणे, धमक्या देणे, शिवीगाळ करणे अशा स्वरूपाचे सहा गंभीर गुन्हे नोंद आहेत. पूर्वी त्यांच्यावर कलम ११० सीआरपीसी अंतर्गत प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, मात्र त्यात सुधारणा झाली नाही.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी MPDA कायद्याअंतर्गत आदेश जारी करून दोन्ही आरोपींना हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून अंबाजोगाई शहर पोलीस आणि स्थागुशा बीड पथकाने कारवाई करून दोन्ही आरोपींना २९ ऑक्टोबर रोजी कारागृहात दाखल केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपोअ चेतना तिडके, सपोअ ऋषिकेश शिंदे, आणि पोनि शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. भविष्यातही अवैध व्यवसाय, जुगार, गुटका विक्री व समाजविघातक कृत्यांवर कठोर कारवाई होईल, असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.