गेवराई : घराच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरातील शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला मारहाण करत घरात प्रवेश करुन सोन्याचांदीच्या दागिन्यांसह नगदी रोकड असा एकूण पाच लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. ही घटना बुधवार दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी दीडच्या सुमारास गेवराई तालुक्यातील सुशी येथे घडली. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेवराई तालुक्यातील सुशी येथील शेतकरी दिलीप निवृत्ती पौळ यांच्या पत्नी वृंदावणी यांनी फिर्याद दिली आहे. बुधवार दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री दीडच्या सुमारास आम्ही घरात असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करत मला व माझ्या पतीला जबर मारहाण केली. जबरदस्तीने घरात ठेवलेल्या लोखंडी पेटीतील सोन्याचे एकूण वजन ०९ तोळे ०८ ग्रॅम दागीने व १४ भार चांदीचे दोन चैन जोड असे सोन्याचांदीच्या दागिन्यांसह नगदी रोकड असा एकूण अंदाजीत पाच लाख सत्तर हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने घेवून रिकाम्या पेट्या गावाजवळ असलेल्या शेतात टाकून दिल्या. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास गेवराई ठाण्याचे पो.नि.प्रविण बांगर , स.पो.नि.संतोष जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि.आढाव व त्यांचे सहकारी पोलीस हे करत आहेत.