कोल्हापूर : शिवाजी पार्क परिसरात लोखंडी एडका आणि बांबूने जीवघेणा हल्ला करून विचारेमाळ येथील तरुणाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी कावळा नाका परिसरातील दोघांना अटक केली. संजय नागप्पा कुचकोरवी (वय 27, रा. माकडवाला वसाहत, कोल्हापूर) व धीरज रमेश वालावलकर (31, शिवाजी पार्क, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. हल्ल्यात असिफ इस्माईल सय्यद (23) हा जखमी झाला.
शिवाजी पार्क येथील हॉस्पिटलसमोर शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. असिफ सय्यद हा मित्र गिरीश पुजारीसमवेत औषध घेण्यासाठी मेडिकल दुकानात जात असताना संजय कुचकोरवी याने त्याला अडवले. आमच्या गल्लीत का आलास, तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून त्याच्या डोक्यावर एडक्याने वार केला. कुचकोरवी याचा साथीदार नकुल जाधव, धीरज वालावलकर यांनी उजव्या पायावर बांबूने हल्ला केला. तिघाही संशयितांनी रस्त्यावर खाली पाडून पुन्हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल होताच दोघांना अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.