सुनील कदम
कोल्हापूर : राज्यात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी होणार्या अपघातांना प्रामुख्याने वाहनांचे प्रखर हेडलाईटस् कारणीभूत ठरताना दिसत आहेत. त्यामुळे याबाबत कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
देशातील परिवहन विभागाने दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या हेडलाईटस्चे काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार रात्रीच्या वेळी वाहन चालवत असताना किमान 70 ते 100 फूट अंतरावरील दृश्य चालकाला दिसेल इतक्याच क्षमतेचे हेडलाईटस् वापरण्याचे बंधन आहे. पूर्वी वाहनांसाठी खास पिवळ्या प्रकाशाचे दिवे वापरण्यात येत होते. मात्र गेल्या दोन-चार वर्षांपासून पांढर्या रंगाचे एलईडी हेडलाईटस् वापरण्यात येत आहेत. मात्र या दिव्यांची प्रखरता किती असावी, याचे निकष परिवहन विभागाने निश्चित केले आहेत. त्यानुसार जरी एलईडी हेडलाईटस् वापरल्या तरी प्रकाशाचे अंतर पूर्वीइतकेच निश्चित करण्यात आलेले आहे.
हेडलाईटस् प्रखरतेचे नियम निश्चित असतानाही प्रामुख्याने अनेक चारचाकी वाहनधारक कंपनीने बसविलेल्या हेडलाईटस् व्यतिरिक्त इतर काही अतिरिक्त प्रखर झोताचे हेडलाईटस् वापरताना दिसतात. अनेक दुचाकीधारक तर कंपनीचे हेडलाईटस् सरळ सरळ काढून टाकून बेकायदेशीरपणे दुसरेच प्रखर प्रकाश झोतांचे हेडलाईटस् वापरताना दिसतात. या हेडलाईटस्चा प्रखर प्रकाश 150 ते 250 फूट अंतरापर्यंत पडतो. शिवाय हा प्रकाश इतका प्रखर असतो की समोरून येणार्या वाहनधारकांचे डोळे दिपून काही क्षणासाठी त्यांना दिसायचेच बंद होते. परिणामी राज्यभरातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चाललेले दिसत आहे.
2023 साली राज्यात 35 हजार 243 अपघात होवून 15 हजार 366 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. 2024 साली एकूण 36 हजार 84 अपघात होवून त्यामध्ये 15 हजार 335 लोकांचा बळी गेला आहे. 2025 साली तर पहिल्या तिमाहीतच रस्ते अपघातातील बळींची संख्या 10 हजारापार गेलेली आहे. यावरून रस्ते अपघातांची अवस्था भयावह असल्याचा अंदाज येतो.
राज्यातील रस्ते अपघातांची विविध कारणे समोर येत असली तरी प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस होणार्या अपघातांना वाहनांवरील हे प्रखर प्रकाशझोतांचे दिवे कारणीभूत होत असल्याचे समोर आले आहे. समोरून येणार्या वाहनाच्या प्रखर हेडलाईटस्च्या प्रकाशामुळे वाहन चालकांना काही काळ पुढचे दिसायचे बंद होते, परिणामी त्याचे वाहनांवरील नियंत्रण सुटते आणि अपघात घडतो, असे शेकडो अपघातांवरून स्पष्ट झाले आहे. केवळ बेकायदेशीर हेडलाईटस्मुळे गेल्या काही वर्षात राज्यात हजारो लोकांचे बळी गेलेले आहेत. त्यामुळे राज्य पातळीवरूनच एखादी विशेष मोहीम राबवून बेकायदेशीर हेडलाईटस् विरूध्द व्यापक कारवाई सुरू करण्याची आवश्यकता आहे.