डॅनियल काळे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. जशास तशी टक्कर देण्यासाठी राजकीय पक्षांनी तोलामोलाचे उमेदवार रिंगणात उतरवण्याची रणनीती आखली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा रंगतदार सामना होणार आहे. प्रभागागणिक उमेदवारांची धावपळ सुरू झाली असून अघोषित प्रचाराने निवडणुकीचा रंग चढत चालला आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेच्या राजकारणावर दबदबा असलेल्या आ. सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे राजकीय मार्ग वेगळे झाल्याने या वेळीची लढत अधिकच रोचक ठरणार आहे. मुश्रीफ हे महायुतीच्या गोटात सामील झाले असून, पाटील यांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा मोर्चा अधिक भक्कम केला आहे. दरम्यान, महाडिक गट, पाटील गट, मुश्रीफ, आ. राजेश क्षीरसागर, शिवसेना-भाजप असे सुमारे सहा गट या निवडणुकीत एकमेकांविरोधात तोफ डागणार आहेत. त्यामुळे यंदा महापालिकेच्या रणांगणात पुन्हा रंगतदार लढत पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
दिग्गज नेते भिडणार
जिल्हाभरात आता नगरपालिका, नगरपरिषद आणि महानगरपालिका अशा निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. प्रत्येक पक्षाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजप, शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी, शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे सेना असे सहा प्रमुख गट कोल्हापुरात थेट आमने-सामने येणार आहेत.
कोल्हापूरचे राजकारण नेहमीच महाडिक विरुद्ध पाटील गटाभोवती फिरत आले आहे. यावेळीही तेच चित्र दिसणार आहे. महाडिक भाजपचा, तर सतेज पाटील खासदार शाहू महाराज यांच्या साथीने इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकाविण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, सतेज पाटील यांचा प्रभाव कमी करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर, खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक हे आपल्या पद्धतीने खेळ्या रचत आहेत. सतेज पाटील यांना घेरण्याची रणनीती त्यांनी आखली आहे.
गणिते मांडली... मतदारसंघावर लक्ष
महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग रचना अंतिम झाली असून, आता प्रत्येक प्रभागात उमेदवार सक्रिय झाले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने अघोषित प्रचार जोमात आहे. विरोधी उमेदवार कोण असेल, हे स्पष्ट होताच पक्षांनी त्यांच्या तोडीचे दिग्गज रिंगणात उतरवण्यास सुरुवात केली आहे. रणनीतिकारांनी प्रभागवार गणिते मांडली असून प्रत्येक मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.