गांधीनगर : उचगाव पैकी मणेर मळा येथील साईश अपार्टमेंटमध्ये सोमवारी सायंकाळी वेश्या अड्ड्यावर छापा टाकून महिलेसह चौघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने ही कारवाई केली.
सुजाता सचिन साळुंखे (वय 34, रा. मिरज, जि. सांगली, सध्या रा. साईश अपार्टमेंट, संजय मोहिते यांच्या भाड्याच्या घरी उचगाव, ता. करवीर), सुमित नेमिनाथ देशमाने (वय 29, रा. कबनूर इचलकरंजी), लखन मोहन कांबळे (वय 36), तौफिक ताजुद्दीन सुतार (36) (दोघेही राहणार विक्रमनगर, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सुजाता साळुंखे साथीदारांसह उचगाव मणेर मळा येथील साईश अपार्टमेंटमध्ये वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती. त्यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हळ यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. या पथकाने बनावट गिऱ्हाईकाच्या मदतीने साईश अपार्टमेंटमधील फ्लॅट जी-वन येथे छापा टाकला. त्या ठिकाणी दोन पीडित महिला आढळून आल्या. त्यांची पोलिसांनी सुटका केली. अनैतिक वाहतूक करणारी कार (एम.एच. 09 सीएम 6314) आणि रिक्षा (एम.एच. 09 ईएल 4240) यासह पाच मोबाईल, रोख 10 हजार 470 रुपयांसह 8 लाख 56 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रॅकेट चालवणाऱ्या महिला व तीन एजंटांना अटक केली. याबाबतची फिर्याद सायली कुलकर्णी यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान, संशयितांना कसबा बावडा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
वेश्या व्यवसाय चालू करण्यासाठी आपली बिल्डिंग देणारा अपार्टमेंटचा मालक सध्या फरार आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र घारगे, अमित मर्दाने, राकेश माने, हिंदुराव चरापले, उत्तम सडोलीकर, अश्विन डुणूंग, प्रज्ञा पाटील यांच्या पथकाने केली.