कोल्हापूर : मोरेवाडी (ता. करवीर) आर.के.नगर-एकता कॉलनी येथील दीपकराव भोसले (वय 73) यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी साडेसोळा तोळ्याचे दागिने व 2 लाखांची रोकड, असा 13 लाख 62 हजारांचा ऐवज लंपास केला. रविवारी हा प्रकार उघडकीला आला. टोळीने पाळत ठेवून बंद बंगल्याला टार्गेट केले आहे. बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेर्याची दिशा बदलल्याने रेकी करूनच चोरट्यांनी घरफोडी केली असावी, असा संशय आहे.
फिर्यादी भोसलेंसह कुटुंबीय दि. 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या काळात त्यांच्या मूळगावी गेले होते. या काळात एकता कॉलनीतील त्यांच्या ‘गीता दीप’ बंगल्याला कुलूप होते. बंगल्यात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी बंगला फोडला. या घटनेमुळे मोरेवाडी, आर.के.नगर परिसरात नागरिकांत चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.
चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कडी-कोयंडा कटावणीने उचकटून प्रवेश केला. बेडरूमसह अन्य खोल्यांतील लोखंडी तिजोरीसह कपाटातील चार तोळ्याचा नेकलेस, सोन्याच्या रिंगा, सोनसाखळी, ब—ेसलेट, सोन्याच्या पाटल्या, पुष्पराज अंगठी, दोन लाखांची रोकड असा 13 लाख 62 हजारांचा ऐवज लंपास केला.
करवीरचे उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. ठसे तज्ज्ञांसह श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.