आशिष शिंदे
कोल्हापूर : सध्या सर्दी, खोकला, ताप आणि थकवा अशा लक्षणांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही साथ सामान्य सर्दी-खोकल्यापेक्षा थोडी वेगळी असून वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते इन्फ्लुएंझा बी विषाणूमुळे निर्माण झाली आहे. शहरात काही रुग्णांच्या रक्त चाचण्या इन्फ्लुएंझा बी पॉझिटिव्ह देखील आल्या आहेत. परिणामी रुग्णांना बरे होण्यासाठी सात ते दहा दिवसांचा कालावधी लागतो, तर खोकला 15 दिवसांहून अधिककाळ राहत आहे. त्यामुळे सध्या रुग्णांवर सिम्प्टोमॅटिक (लक्षणांवर आधारित) उपचार केले जात आहेत. यामुळे कोल्हापूरकरांनो अशी लक्षणे दिसल्यास थोडी काळजी घेण्याची गरज आहे.
कोल्हापूरसह काही जिल्ह्यांत व्हायरल इन्फेक्शनसह इन्फ्लुएंझा बी विषाणूचा प्रसार गेल्या काही आठवड्यांत झपाट्याने वाढताना दिसत आहे. ईएनटी तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पूर्वी रुग्णांना औषधे दिल्यानंतर तीन ते चार दिवसांत बरे वाटत होते. आता औषधांचा कालावधी वाढवावा लागत आहे. सात ते दहा दिवस उपचारांची गरज भासत असून खोकला काही वेळा 15 दिवसांपर्यंत राहतो. सुरुवातीला कोरडा खोकला दिसतो आणि दुर्लक्ष झाल्यास तो कफयुक्त होतो. यानंतर अनेक रुग्णांना हायर अँटिबायोटिक्स घ्यावे लागत आहेत. काहींच्या कोव्हिड चाचण्या देखील पॉझिटिव्ह येत आहेत, मात्र लक्षणे अतिशय सौम्य आहेत.
एकापासून दुसर्याला संक्रमण होण्याची शक्यता
या विषाणूचा प्रसार विशेषतः हवेतून आणि संपर्कातून होतो. संक्रमित व्यक्ती शिंकते, खोकते किंवा बोलते तेव्हा हवेतून विषाणू पसरतो आणि दुसर्या व्यक्तीच्या नाक-घशात प्रवेश करतो. पृष्ठभागावरही हा विषाणू काही तास टिकू शकतो. घरातील एखाद्याला सर्दी झाली की इतर सदस्य संक्रमित होण्याची शक्यता 50 ते 70 टक्क्यांपर्यंत असते.
तज्ज्ञांचा सल्ला घ्या
इन्फ्लुएंझाची लक्षणे सामान्य फ्लूसारखी असली तरी ती अधिक काळ टिकतात. यामध्ये अचानक ताप येणे घसा खवखवणे किंवा दुखणे, सुरुवातीला कोरडा, नंतर कफयुक्त खोकला, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी, नाक गच्च होणे किंवा वाहणे, आवाज बसणे किंवा घशात कोरडेपणा अशी लक्षणे दिसतात.