कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयाच्या कुंभी इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ शववाहिका उभी केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाने चालकाला शववाहिका अन्यत्र हलविण्यास सांगितले. यावरून गुरुवारी दुपारी शाब्दिक वादावादी आणि हातघाई झाली; तर रात्री सीपीआरमध्येच दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे सीपीआर हादरून गेले आहे.
हाणामारीत सुरक्षारक्षक आणि चालक जखमी झाला आहे. वैद्यकीय अधिकारी, सुरक्षा अधिकारी यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. पण प्रशासनाने दोषींवर अद्याप कारवाई का केली नाही हा संशोधनाचा विषय आहे. सीपीआर येथे रस्ते, गटारी, इमारतींची कामे सुरू आहेत. त्यामुळे पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिसरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्किट बेंचकडील प्रवेशद्वारातून वाहने आत घ्या आणि शाहू स्मारककडील (उत्तरेकडील) प्रवेशद्वारातून बाहेर सोडा, अशी सूचना केली आहे.
त्यामुळे भाऊसिंगजी रोडवरील वाहतूक कोंडी थोडी कमी झाली आहे. पण उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी शववाहिका होती. ती अन्यत्र हलवा, अशी असे सुरक्षारक्षकाने चालकाला सांगितले. मात्र मुर्दाड चालकाने शववाहिका रस्त्यावरून काढली नाही. संबंधित सुरक्षारक्षकाने शववाहिकेचा फोटो काढून वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी यांना पाठविला. यानंतर चालकाला सूचना करून शववाहिका अन्यत्र लावण्यात आली.
हा राग मनात धरून रात्री मद्यधुंद अवस्थेत चालक सीपीआरमध्ये आला. त्याने सुरक्षारक्षकाबरोबर हुज्जत घालून दहशत माजवली. अंगावर धावून जाऊन लोखंडी रॉडने सुरक्षारक्षकाला मारहाणा केली. झटापटीत दोघे जखमी झाले. अन्य सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी सीपीआरकडे धाव घेतली. पण दोषींवर कारवाईचे धाडस प्रशासनाने दाखविले नाही.