कोल्हापूर : ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांची जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. 3) सायंकाळी 5 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रादेशिक सहसंचालक संगीता डोंगरे यांनी सर्व साखर कारखान्यांना पत्र पाठविले आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
एक नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. परंतु पावसामुळे हंगामात अडथळे येऊ लागले आहेत. गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी शेतकरी संघटनांच्या वतीने पहिली उचल रक्कम सुमारे 3750 रुपयांच्या वर मागण्यात आली आहे. कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा. नंतरच कारखाने सुरू करावेत यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या वतीने जिल्ह्यात आंदोलन सुरू झाले आहे. सर्व संघटनांच्या वतीने आठ दिवसांपूर्वी साखर सहसंचालक कार्यालयावर निदर्शने करून ऊस दर प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी मागणी केली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी बैठक घेऊन आंदोलन तीव— करण्याचा इशारा दिला होता. काही ठिकाणी उसाची वाहने अडविण्यात येऊ लागली आहेत. त्यामुळे वातावरण तापू लागले असल्याने ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी बैठक बोलवावी, अशी मागणीही विविध शेतकरी संघटनांकडूनही होत होती. या पार्श्वभूमीवर ऊस दराच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व साखर कारखानदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व साखर कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांनी उपस्थित राहावे, असे अवाहन करण्यात आले आहे.