कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील बहुतांश स्ट्रीट लाईट बंद आहेत. शहरात बहुतांश ठिकाणी अंधाराचे साम्राज्य आहे. उपनगरात तर स्ट्रीट लाईट असून नसल्यासारखी स्थिती आहे. परिणामी, गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्याबरोबरच लहान-मोठे अपघातही वाढले आहेत. स्ट्रीट लाईटसाठी खांब आहेत; पण वीज गायब अशी स्थिती झाली आहे. विशेष म्हणजे, शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या शिरोली टोल नाका ते कावळा नाका, स्टेशन रोड, विद्यापीठ रोड, राजाराम रोड, सर्किट हाऊस परिसर तसेच महत्त्वाच्या मार्गावरही हीच स्थिती आहे. गेल्यावर्षी तब्बल 12 हजारांवर स्ट्रीट लाईट बंदच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
सन 2017 मध्ये ऊर्जा संवर्धनासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने एका खासगी कंपनीसोबत करार केला. त्यानंतर शहरात सुमारे 33 हजारांहून जास्त एलईडी दिवे बसविण्यात आले. मुळातच अनेक ठिकाणी 150 वॅटचे दिवे काढून तेथे 50 ते 70 वॅटचे दिवे बसविले आहेत. त्यातच काही महिन्यांतच अनेक एलईडी दिवे बंद पडू लागले. अनेक ठिकाणी एलईडी दिव्यांच्या प्रकाशाची क्षमता अत्यंत कमी झाल्याने तेथे अंधूक प्रकाश आहे. दिवे बंद असल्याबाबत महिन्याला हजारावर तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. कमी वॅटचे आणि दोन विद्युत खांबांतील अंतर जास्त असल्याने उपनगरांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यात दिवे खराब असणे, बंद असणे यासह विविध तक्रारींचा समावेश आहे. करार केलेल्या कंपनीने एलईडी दिवे देणे बंद केल्याने शहरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली असून गुन्ह्यांतही वाढ झाली आहे.
राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ऊर्जा संवर्धनासाठी शहरातील जुने पथदिवे काढून त्या ठिकाणी नवीन एलईडी दिवे बसविण्यासाठी एका खासगी कंपनीबरोबर 7 जानेवारी 2019 ला करार करण्यात आला. करारानुसार कंपनीने जुन्या पथदिव्यांच्या ठिकाणी सुमारे 13 कोटींतून नवीन एलईडी दिवे बसवायचे. त्यातून होणार्या वीज बचतीच्या रकमेतून प्रत्येक महिन्याला 35 लाख रुपये संबंधित कंपनीला द्यायचे आहेत. सात वर्षांसाठीचा हा करार आहे. त्यानुसार कंपनीतर्फे शहरात 33 हजार 372 एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. सात वर्षे देखभाल-दुरुस्ती संबंधित कंपनीने करायची आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात स्ट्रीट लाईट बंद असल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी एलईडी आहेत; पण त्याचा प्रकाश रॉकेलच्या दिव्यासारखा आहे. परिणामी, तक्रारींचा निपटारा करावा म्हणून महापालिका प्रशासनाने संबंधित कंपनीला कळविले आहे, तरीही अनेक ठिकाणी बल्ब बदलले नाहीत. त्यामुळे महापालिकेने संबंधित कंपनीचे सुमारे 4 कोटी रुपये बिल रोखले आहे. कामे पूर्ण करा, त्यानंतरच बिले दिली जातील, असे प्रशासनाने ठणकावून सांगितले आहे.
शहर व उपनगरांत स्ट्रीट लाईट बंद असल्याने अंधार पसरलेला असतो. अनेक ठिकाणी रस्त्यातील दुभाजके दिसत नाहीत. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे दुचाकी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. दुभाजकांना धडकून, वाहने घसरून, खड्ड्यांत आदळून दुचाकीवरील व्यक्ती पडत आहेत. त्यात हातापायाला लागण्यापासून गंभीर दुखापती होऊन अनेकांना दोन-चार महिने घरी बसण्याची वेळ येत आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होत आहे.